Five people died in Nanded district due to reckless transportation by sand mafia!
नांदेड, पुढारी वृत्तसेवा मागील महिनाभरामध्ये जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात वाळूची वाहतूक करणाऱ्या सुसाट वाहनांनी (हायवा) धडक दिल्यामुळे पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर विनाक्रमांक व बेकायदेशीर वाहतुकीचा विषय ऐरणीवर आला आहे. जिल्हा प्रशासनाने मुदखेड तालुक्यात काही कारवाया केल्यानंतर वाळूमाफियांचा मुदखेडलगतच्या उमरी तालुक्यामध्ये सुरू झाला आहे. यातच एका हायवाने उमरीजवळ धडक दिल्याने एक बैल जखमी झाला. उच्छाद नांदेडजवळच्या मुदखेड परिसरात काही दिवसांपूर्वी हायवाने धडक दिल्यामुळे संतोष टाक या व्यावसायिकाचा मृत्यू झाला.
त्याआधी उमरी तालुक्यातील सिंधी येथे तसेच सोनखेड, सिडको आणि कुंडलवाडी येथेही हायवाच्या धडकेमुळे चार जणांचा मृत्यू झाला होता. मुदखेड तालुक्यातील बेफाम वाळू उपशाची दखल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी घेतल्यामुळे त्या भागात महसूल आणि पोलीस विभागाच्या यंत्रणेने बऱ्याच कारवाया केल्या. पण त्यानंतर वाळू माफियांनी आपला मोर्चा उमरी तालुक्याकडे वळविला.
या तालुक्यातील वेगवेगळ्या गावांजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीतून वाळू उपसा आणि हायवातून वाहतूक असे प्रकार बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याची तक्रार बारड येथील काँग्रेस कार्यकर्ते संदीपकुमार देशमुख बारडकर यांनी केली आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार उमरी तालुक्यातील प्रमोद आनंदराव पवार यांच्या मालकीच्या बैलास एका अज्ञात हायवाने धडक देऊन जखमी केले. या प्रकरणात धर्माबादच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी वाळू उपसा आणि बाहतुकीविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले; पण उमरी तालुक्यात वाळूमाफिया जोमात आणि प्रशासन कोमात अशी स्थिती असल्याची टीका बारडकर यांनी केली.
बिबट्यापेक्षा हायवाची भीती जास्त
जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये बिबट्याच्या संचाराच्या व त्याने केलेल्या काही हल्ल्यांच्या घटना समोर आल्यानंतर त्या भागातील ग्रामस्थांच्या भयकहाण्यांना वाचा फुटली; पण जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठच्या हरित पट्ट्यात असलेल्या गावांमध्ये वाळूमाफिया आणि त्यांच्या अवजड वाहनांनी धास्ती निर्माण केली आहे. आम्हांला बिबट्यापेक्षा हायवाची जास्त भीती वाटत आहे, अशी प्रतिक्रिया उमरी तालुक्यातील वाई येथील शेतकरी प्रमोद आनंदराव पवार यांनी व्यक्त केली आहे.