Female Deputy Tehsildar caught red-handed while taking bribe
हदगाव, पुढारी वृत्तसेवा : नोव्हेंबर महिन्याचे स्वस्त धान्य ई-पॉज मशिनवर अपलोड करण्यासाठी दहा टक्के या प्रमाणे ५ हजार ७०० रुपयांची मागणी नायब तहसीलदार यांच्यावतीने करणाऱ्या त्यांच्या कंत्राटी संगणक चालक असलेल्या हस्तकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही घटना शनिवारी घडली.
हदगाव तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातर्फे एका स्वस्त धान्य दुकानदाराला गेल्या चार महिन्याचा जो धान्य पुरवठा झाला होता, त्याचे कमिशन म्हणून त्याला ५७ हजार रुपये मिळाले. त्याच वेळी नोव्हेंबर २०२५ चे धान्य प्राप्त झाले आहे. धान्य पुरवठा निरीक्षकांनी ते ई-पॉज या मशीनवर अपलोड केले नव्हते. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदाराला पुढील धान्य वाटप करता येणार नव्हते. तसेच नव्याने २७ लाभार्थ्यांचे नावे ऑनलाईन करायचे होते. त्यासाठी १८ नोव्हेंबर २०२५ रोजी स्वस्त धान्य दुकानदाराने पुरवठा विभागाच्या निरीक्षक सुमन कन्हाळे यांची तहसील कार्यालयात भेट घेतली.
दरम्यान, नायब तहसीलदार व धान्य पुरवठा निरीक्षकांनी कंत्राटी संगणक डेटा एंन्ट्री ऑपरेटर गोविंद जाधव यांना बोलावून त्याला आपल्या इच्छेनुसार सूचना दिल्या. त्यानुसार जाधव याने स्वस्त धान्य दुकानदाराला नोव्हेंबरचे धान्य इ पॉज मशीनवर अपलोड करणे, २७नवीन लाभार्थ्यांचे नाव ऑनलाईन करणे, तसेच शासनाकडून मिळालेले हक्काचे कमिशन ५७ हजार रुपयांवर २० टक्के प्रमाणे रकमेची मागणी केली. परंतु दुकानदाराला डेटा एन्ट्री ऑपरेटरच्या माध्यमातून झालेली ही मागणी मान्य नव्हती. त्यामुळे त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार नोंदवली.
उपरोक्त तक्रारीची गांभिर्याने दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि. २२ नोव्हेंबर रोजी हदगाव तहसील कार्यालयात सापळा रचला. त्यात पुरवठा निरीक्षण अधिकारी तथा नायब तहसीलदार सुमन कऱ्हाळे ह्या अडकल्या. त्यांनी डेटा एन्ट्री ऑपरेटर गोविंद जाधव यास तक्रारदाराकडून ५ हजार ७०० रुपये स्वीकारण्यास सांगितले. गोविंद जाधव यांनी तक्रारदाराकडून ही रककम स्वीकारली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यास रंगेहात पकडले. या कारवाईमध्ये त्यांचे मोबाईल ताब्यात घेण्यात आले आहेत.