Nanded illegal medicine sale pudhari photo
नांदेड

Nanded illegal medicine sale : नांदेडमध्ये विनापरवाना औषध विक्री करणाऱ्यावर छापा

एलसीबी, एफडीएची संयुक्त कारवाई; मेफेन्टर्मिन सल्फेट इंजेक्शन जप्त

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : जिम करणाऱ्या तरुणांना आणि इतर ग्राहकांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय बेकायदेशीररीत्या वैद्यकीय औषधांची विक्री करणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाने (FDA) संयुक्त कारवाई करत अटक केली. त्याच्याकडून १५ हजार १८२ रुपये किमतीचे मेफेन्टर्मिन सल्फेट इंजेक्शन जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख वजाहत शेख हुसेन (वय २७, रा. फारुख नगर, नांदेड) असे अटक केलेल्या मुख्य आरोपीचे नाव असून, त्याचा मुख्य पुरवठादार साथीदार मुश्फेक ऊर्फ अनस (रा. देगलूर नाका) हा सध्या फरार आहे.

नांदेड जिल्ह्यात बनावट व विनाप्रिस्क्रिप्शन औषध विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. १८ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेला फूल मार्केट परिसरात एक इसम बेकायदेशीर औषधे विक्रीसाठी फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने पंचांसमक्ष सापळा रचून शेख वजाहत याला ताब्यात घेतले.

त्याच्या पिशवीची झडती घेतली असता, ओफेन' आणि 'टेरमिव्हा' कंपन्यांच्या एकूण ४२ इंजेक्शनच्या काचेच्या बाटल्या असा मुद्देमाल सापडला. चौकशीत आरोपीकडे औषध विक्रीचा कोणताही वैध परवाना किंवा बिल आढळले नाही. हे इंजेक्शन तो जिम करणाऱ्या तरुणांना जास्त नफ्यासाठी विकत होता.

अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त अशोक राठोड यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता जीवनावश्यक वस्तू अधिनियम आणि औषध सौंदर्य प्रसाधने कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नागरिकांनी अधिकृत दुकानातूनच आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे खरेदी करावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT