

नांदेड : विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांसाठी गेल्या 20 ते 21 दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर शांततापूर्ण व संबंधित लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करणारे ज्येष्ठ पर्यावरणवादी वैज्ञानिक सोनम वांगछुक व कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना बळाचा वापर करून मोदी सरकारच्या इशाऱ्यावर पोलिसांकरवी झालेल्या मारहाणीचा व दिल्या गेलेल्या अपमानास्पद वागणुकीचा विविध पक्ष व संघटनांच्या वतीने सोमवारी महात्मा फुले पुतळ्यासमोर बैठा सत्याग्रह करून जाहीर निषेध करण्यात आला.
विविध संघटना व सर्वपक्षीय कृतीसमिती च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, "नीट" पेपर फुटीस जबाबदार असलेल्या शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी एकदिवशीय बैठा सत्याग्रह करण्यात आला.
देशातील तमाम नीट परीक्षार्थींना न्यायाची, पारदर्शकतेची आणि भविष्यातील विश्वासाची हमी मिळावी, नीट पेपर फुटीच्या नैराशेतून आत्महत्या केलेल्या वीस विद्यार्थ्यांना न्याय मिळावा व नीट पेपर फुटीस जबाबदार असलेल्या केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा किंवा तो पंतप्रधानांनी घ्यावा, या मागण्यांकरिता सनदशीर, लोकशाही, अहिंसक व शांततेच्या मार्गाने, विद्यार्थ्यांच्या हिताकरिता मागील वीस दिवसांपासून आरंभीलेल्या आमरण उपोषणाद्वारे आपले प्राण पणाला लावणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच वैज्ञानिक सोनम वांगछूक यांना पोलिसांकडून बळाचा व दडपशाहीचा वापर करून त्यांचे उपोषण दडपण्याचा प्रयत्न केला गेला आहे. उपोषण स्थळावरून त्यांना एखाद्या आरोपी सारखे फरफटत नेऊन अपमानास्पद वागणूक दिल्या गेली.
हल्याचा निषेध
शासनाची ही कृती सरंजामी, हुकुमशाही व अधिकारशाही स्वरूपाची असून शासनाच्या या रानटी, क्रूर व निष्ठुर लाठी हल्ल्याचा नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गासहित, पालक, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षण प्रेमी व विविध पक्ष संघटनाचे पदाधिकाऱ्यांनी सामूहिकरीत्या एकमुखाने जाहीर निषेध केला.