Father sells his own daughter for money
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : पैशाच्या लालसेपोटी स्वतः च्या मुलीची विक्री करणारा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्ह्यात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पित्यासह दोघांविरुद्ध भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली येथील दुय्यम निबंधक कार्यालयात कार्यरत असलेल्या गजानन वांजरखेडे याचा विवाह २००९ मध्ये सुरेखा यांच्यासोबत झाला होता. विवाहानंतर त्यांना एक मुलगा व दोन जुळ्या मुली असे अपत्य झाली. गजानन वांजरखेडे यांनी त्यांची एक मुलगी शुभांगी ऊर्फ दुर्गा (वय ८) हिला त्यांचेच नातेवाईक असलेल्या देविदास जोशी (रा. मार्तंड, विष्णुपुरी) यांना विक्री केली. सन २०१८ मध्ये गजानन वांजरखेडे यांनी पत्नीला घराबाहेर काढले.
तेव्हापासून त्याची पत्नी आपल्या नातेवाईकांकडे राहात होती. यादरम्यान तिची तिन्ही मुले गजानन वांजरखेडे यांच्याकडे रहात होते. काही दिवसांपूर्वी गजानन वांजरखेडे याने मुलीला पैशाच्या लालसेपोटी नातेवाईकांना विकल्याचे समजल्यानंतर त्या महिलेने भाग्यनगर ठाणे गाठून रीतसर तक्रार दिली. पोलिसांनी गजानन विनायक वांजरखेडे व देविदास गजानन जोशी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.