Nanded News : किनवट, कंधारमधील शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत Pudhari
नांदेड

Crop Insurance News : किनवट, कंधारमधील शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत

२२.३२ कोटींपैकी केवळ १०.२२ कोटींचे वितरण

पुढारी वृत्तसेवा

Farmers in Kinwat and Kandhar Awaiting Crop Insurance

अरूण तम्मडवार

किनवट : खरीप २०२५ हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत किनवट तालुक्यातील नऊ महसूल मंडळांतील सोयाबीन पीक विम्याची प्रक्रिया अद्याप अनेक ठिकाणी अपूर्ण असल्याचे चित्र समोर आले आहे. तालुक्यातील एकूण २२ हजार ६३८ शेतकऱ्यांनी विम्यासाठी अर्ज केले असून १९ हजार ६०८.६४ हेक्टर क्षेत्रासाठी २२.३२ कोटी रुपयांचा दावा मंजूर झाला आहे. मात्र त्यापैकी केवळ १०.२२ कोटी रुपयांचे वितरण झाले असून १२.११ कोटी रुपये अद्याप प्रलंबित आहेत.

तालुक्यातील दहेली आणि शिवणी महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दहेली महसूल मंडळातील १ हजार ८१७ अर्जदारांच्या १,५२७.५६ हेक्टर क्षेत्रासाठी मंजूर झालेला ३.६६ कोटी रुपयांचा संपूर्ण दावा वितरित करण्यात आला आहे. तर शिवणी महसूल मंडळातील ३ हजार ३५० अर्जदारांच्या २,५५२.५१ हेक्टर क्षेत्रासाठी सर्वाधिक ६.५६ कोटी रुपयांचा दावा मंजूर झाला असून, त्यातील ६.५५ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. केवळ १ लाख रुपयांची रक्कम प्रक्रियेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दुसरीकडे राज्य शासनाचा हिस्सा प्रलंबित असल्याने बोधडी, किनवट आणि उमरी बाजार महसूल मंडळांतील शेतकरी अद्याप लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. बोधडी महसूल मंडळातील ३ हजार ५८८ अर्जदारांच्या ३,३५७.२५ हेक्टर क्षेत्रासाठी ५.९२ कोटी रुपये, किनवट महसूल मंडळातील २ हजार २४६ अर्जदारांच्या २,०८०.९५ हेक्टर क्षेत्रासाठी ४.१८ कोटी रुपये तर उमरी बाजार महसूल मंडळातील १ हजार ११९ अर्जदारांच्या ८५४.४१ हेक्टर क्षेत्रासाठी २ कोटी रुपयांचा दावा मंजूर झाला असला, तरी राज्य शासनाचा हिस्सा प्रलंबित असल्याने लाभवितरण झालेले नाही.

दरम्यान, इस्लापूर, जलधारा, मांडवी आणि सिंदगी (मो.) या चार महसूल मंडळांतील दाव्यांची गणना प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. इस्लापूर महसूल मंडळात सर्वाधिक ४ हजार २१९ अर्जदारांच्या ३,७५७.२७ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. तर जलधारा महसूल मंडळात २ हजार ६०० अर्जदारांचे २,२६०.७९ हेक्टर, सिंदगी (मो.) येथे २ हजार ५११ अर्जदारांचे २,११३.५९ हेक्टर आणि मांडवी येथे १ हजार १८८ अर्जदारांचे १,१०४.३१ हेक्टर क्षेत्र विम्याअंतर्गत आहे. या चार महसूल मंडळांतील दाव्यांची गणना अद्याप बाकी असल्याने मोठ्या संख्येने शेतकरी अनिश्चिततेच्या छायेत आहेत.

उबाठाचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

कंधार तालुक्यातील पाच कृषी मंडळांतील शेतकऱ्यांना मंजूर विमा रक्कम अद्याप मिळालेली नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उपविभागीय अधिकारी विलास नरवटे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदनात कंधार तालुक्यातील पाच कृषी मंडळातील मंजूर झालेला विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख परमेश्वर जाधव यांनी केली.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत तालुक्यातील विविध महसूल मंडळांतील दाव्यांची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे. काही मंडळांतील लाभार्थ्यांना रक्कम वितरित करण्यात आली असून उर्वरित मंडळांतील प्रक्रिया संबंधित स्तरावर सुरू आहे. प्रलंबित बाबींची पूर्तता होताच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल. शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता न करता संयम ठेवावा.
-चंद्रकांत निमोड, तालुका कृषी अधिकारी, किनवट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT