Farmer escapes leopard attack in Himayatnagar
हिमायतनगर; पुढारी वृत्तसेवा : हिमायतनगर तालुक्यातील वडगाव तांडा शिवारात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या एका तरुण शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक प्राणघातक हल्ला चढवला. मात्र, शेतकऱ्याने दाखवलेले प्रसंगावधान आणि मालकाच्या मदतीला धावून आलेली जनावरे, यामुळे बिबट्याला पळ काढावा लागला. ही घटना शनिवारी (दि. ६) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात शेतकरी बालंबाल बचावला असून झटापटीत कपडे फाटून किरकोळ दुखापत झाली आहे.
उल्हास अनिल जाधव असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शनिवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे आपल्या शेताकडे जनावरे चारण्यासाठी गेले होते. सकाळी ११ वाजेच्या सुमारास झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर झेप घेतली. या अचानक झालेल्या हल्ल्याने उल्हास घाबरले नाहीत. त्यांनी आरडाओरड करत बिबट्याचा प्रतिकार केला. ही घटना इस्लापूर आणि हिमायतनगर वनक्षेत्राच्या हद्दीवर घडली.
गुरांनी वाचवला जीव उल्हास यांचा आरडाओरडा ऐकून जवळच चरत असलेली त्यांची जनावरे बिबट्याच्या दिशेने धावून आली. जनावरांचा हा आक्रमक पवित्रा आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांची चाहूल लागताच बिबट्याने उल्हास यांना सोडून धूम ठोकली. या झटापटीत उल्हास यांचे कपडे फाटले असून त्यांना नखांमुळे दुखापत झाली आहे. ते मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावले आहेत.