Mukhed Electric Shock Farmer Death
मुखेड : शेतातील तूर पिकाला पाणी देण्यासाठी विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. ३) सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास मुखेड तालुक्यातील सलगरा (बु.) येथे घडली. माधव प्रल्हाद हलबुगे (वय ५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
सलगरा (बु.) येथील अल्पभूधारक शेतकरी माधव हलबुगे हे आपल्या शेतातील तूर पिकाला पाणी देण्यासाठी नदीकाठावरील विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. मोटार सुरू करत असताना अचानक विजेचा धक्का लागल्याने ते जागीच कोसळले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना तातडीने उपचारासाठी मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी गरुडकर यांनी तपासणी केल्यानंतर हलबुगे यांना मृत घोषित केले.
माधव हलबुगे हे अल्पभूधारक शेतकरी असून, शेतीच्या उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे.