Tembhurni Elderly Woman found Dead Body
हिमायतनगर : तालुक्यातील टेंभुर्णी येथे राहणाऱ्या वृध्द महिलेचा मृतदेह राहत्या घरी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. महिलेचा मृत्यू कशा प्रकारे झाला, या बाबतीत पोलिस तपास करीत आहेत. घटने संदर्भात पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. महिलेचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. हिमायतनगर पोलिसांत आज (दि.६) या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, हिमायतनगर तालुक्यातील टेंभुर्णी येथील गयाबाई रामजी तवर (देवसरकर) ( वय ७५) ही घरात एकटीच राहात होती. तिच्या पश्चात तीन मुली असून त्या विवाहित आहेत . गुरूवारी सायंकाळी चार ते पाच दरम्यान शेजारी राहणाऱ्या नागरिकांना घरातून दुर्गंधी येत असल्याने नागरिकांना संशय आला. गावातील नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटना स्थळी भेट दिली.
घराचा दरवाजा उघडला असता महिलेचा मृतदेह आढळून आला. नैसर्गिक मृत्यू की खून हे पोलिस तपासाअंती स्पष्ट होणार आहे. त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक अमोल भगत यांनी सांगितले.