Crime News pudhari photo
नांदेड

Nanded Crime : संपत्तीच्‍या मोहापायी मुलानेच नातवाच्या साथीने संपवले जन्‍मदात्‍या आईचे छत्र

माणुसकीचा खून; नांदेडमधील ह्दयद्रावक घटना, दाेघांनाही अटक

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : ज्या आईने बोट धरून चालायला शिकवले, ज्या हातांनी घास भरवून मोठे केले, त्याच पोटच्या मुलाने आणि नातवाने संपत्तीच्या हव्यासापोटी वृद्ध आईचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना नांदेड शहरातील जयप्रकाश नगर, असर्जन येथे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नातेसंबंधांना काळीमा फासणाऱ्या या कृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पोलिसांनी याप्रकरणी तत्परता दाखवत आरोपी मुलगा आणि नातवाला बेड्या ठोकल्या आहेत. शकुंतलाबाई प्रकाशराव दिनकटवार (वय ६२, रा. जयप्रकाश नगर, असर्जन, नांदेड) असे दुर्दैवी मृत आईचे नाव आहे. तर प्रविण प्रकाशराव दिनकटवार (४०, मुलगा) आणि प्रतिक प्रविण दिनकटवार (१९, नातू) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत शकुंतलाबाई यांच्या नावावर असलेली काही संपत्ती त्या आपल्या मुलीच्या नावावर करणार होत्या. आपल्या हक्काची संपत्ती बहिणीला मिळणार या रागातून घरात सातत्याने वाद होत होते. बुधवारी (दि. १५ जुलै) रात्री ११ च्या सुमारास याच घर हिस्सा वाटणीच्या कारणावरून मुलगा प्रविण आणि नातू प्रतिक यांनी आई शकुंतलाबाई यांच्याशी वाद घातला. हा वाद इतका विकोपाला गेला की, दोघांनीही क्रूरतेची सीमा ओलांडली. त्यांनी वृद्ध शकुंतलाबाई यांच्या डोक्यात स्क्रू ड्रायव्हर खुपसला आणि त्यानंतर गळा कापून अत्यंत निर्घृणपणे त्‍यांचा खून केला.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक (LCB) आणि फॉरेन्सिक लॅबची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी जेव्हा संशयित मुलगा प्रविण आणि नातू प्रतिक यांची कसून चौकशी केली, तेव्हा त्यांच्या उत्तरांमधील विसंगती उघडी पडली. अखेर पोलिसांच्या खाक्या दाखवताच त्यांनीच संपत्तीसाठी आईचा खून केल्याची कबुली दिली.

आधी खून केला, मग रचला 'बनाव'

आईचा जीव घेतल्यानंतर स्वतःला वाचवण्यासाठी आरोपींनी अत्यंत थंड डोक्याने कट रचला. रात्री खून केल्यानंतर दोघेही घरातून निघून गेले. गुरुवारी (दि. १६ जुलै) सकाळी 'आपल्याला आईच्या मृत्यूची काहीच माहिती नाही', असा आव आणत त्यांनी घरी येऊन आईच्या खुनाचा बनाव रचला. मात्र, पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेतून ते सुटू शकले नाहीत.

बहिणीची फिर्याद, पोलिस तपास सुरू

या हत्येप्रकरणी मृत शकुंतलाबाई यांची मुलगी पुजा सचिन शिरडकर (वय ४२, रा. गोकुळनगर, नांदेड) यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रविण दिनकटवार आणि प्रतिक दिनकटवार यांच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संपत्तीच्या हव्यासापोटी रक्ताच्याच नात्याने घेतलेला हा बळी आज समाजमन सुन्न करून गेला आहे. आईच्या मायेला पैशांच्या मोहाने कसे संपवले, याचीच चर्चा आज संपूर्ण नांदेड जिल्ह्यात सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT