संजीव कुळकर्णी
नांदेड : "त्यांची मिसेस काही तरी मेंबर ऑफ पार्लमेन्ट आहे ना. त्यांच्याशी मी बोललो आहे...” हे विधान आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे!
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्यावर गुरुवारी दुपारी माता साहिब गुरुद्वारामध्ये प्राणघातक हल्ला झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यासह राज्याच्या गृह विभागातील वरिष्ठ अधिकार्यांनी वरील घटनेची सत्त्वर नोंद घेत स्थानिक प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतरच्या घडामोडींमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही नांदेडच्या पोलिस अधीक्षकांशी चलभाषवरून संपर्क साधला. पोलिस अधीक्षकांशी आपल्या घरूनच बोलतानाचा शिंदे यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वांनाच त्यांच्या संभाषणशैलीचा परिचय झाला.
अशा गंभीर किंवा महत्त्वाच्या घटनांनंतर मंत्री आणि संबंधित अधिकारी यांच्या दरम्यान बोलणे होतच असते, तसे ते झाले. पण बादल यांच्या पत्नी हरसिमरतकौर यांच्या राजकीय स्थानासंदर्भात शिंदे कसे बोलले, ते वरील व्हिडिओतून समोर आले. ‘काही तरी मेंबर ऑफ पार्लमेन्ट आहे ना,’ हा शिंदे यांनी केलेला उल्लेख अनेकांना अनाकलनीय वाटला. त्यावर समाजमाध्यमांत प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.
विशेष म्हणजे नांदेड पोलिस अधीक्षकांशी बोलण्यापूर्वी शिंदे यांचे खा.हरसिमरतकौर बादल यांच्याशीही बोलणे झाले होते. हल्लेखोरास पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले होते, तरी हल्ल्यामागे आणखी कोण कोण आहेत, याचा तपास करा, असे खा.श्रीमती बादल यांनी शिंदे यांना सांगितले होते. त्यांच्याशी बोलणे झाल्यानंतर शिंदे पोलिस अधीक्षकांशी बोलले. या संभाषणादरम्यान श्रीमती बादल यांच्या पदाचा उल्लेख त्यांच्याकडून ‘काही तरी...’ असा झाला. या प्रकरणाच्या तपासासाठी चांगला ऑफिसर लावा, अशी एक मौलिक सूचनाही त्यांनी पोलिस अधीक्षकांना दिली.
मी तुमच्याशी बोललो आहे, हे खा.श्रीमती बादल यांना भेटून सांगा, असाही एक आदेश शिंदे यांनी नांदेडच्या पोलिस अधीक्षकांना दिला. नांदेडमध्ये दर्शनासाठी आलेल्या एका महत्त्वाच्या नेत्याच्या बाबतीत असा प्रकार होणे ही बाब गंभीर आहे, याबद्दलची चिंताही त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाली.