

विशेष प्रतिनिधी
नांदेड : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल हे गुरुवारी माता साहिब गुरुद्वारा परिसरात झालेल्या हल्ल्यातून बचावले. या हल्ल्यात त्यांच्या उजव्या हाताला इजा झाल्यानंतर स्थानिक डॉक्टरांनी आवश्यक ते उपचार केले असले, तरी हल्लेखोराचा धारदार खंजरने त्यांच्या छातीवर वार करण्याचा प्रयत्न होता; पण तो विशेष सुरक्षा पथकातील पोलिस निरीक्षक संतोष केंद्रे यांच्या सतर्कतेमुळे अयशस्वी ठरला.
संतोष केंद्रे यांनी सतर्कताच दाखवली नाही, तर बादल यांच्या छातीवर होणारा वार अडवून हल्लेखोरास बाजूला ढकलले. या झटापटीत त्यांच्या हातालाही जखम झाली, तर सुखबीरसिंग बादल यांच्या उजव्या हाताच्या कोपराच्या खाली खंजरचा वार लागला. ही संपूर्ण माहिती मुदखेड पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी संतोष केंद्रे यांचा लेखी जबाब घेतल्यानंतर समोर आली.
नांदेडपासून ते दिल्ली व सबंध पंजाब राज्यापर्यंत खळबळ माजविणार्या वरील घटनेतील हल्लेखोर आरोपीला स्थानिक पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. नंतरच्या चौकशीत त्याचे नाव जसपालसिंग ऐधन असल्याचे व तो पुण्याचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी संतोष केंद्रे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम १०९ (१), ११८ (१), १२१ (२) व शस्त्र अधिनियमातील कलमांखाली मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पो.नि.संतोष केंद्रे यांच्या जबाबातून सुखबीरसिंग बादल व त्यांच्या पत्नी खा.हरसिमरत कौर बादल यांच्या नांदेड दौर्याची व या दौर्यादरम्यानच्या घडामोडींची संपूर्ण माहितीही समोर आली. बादल दाम्पत्याच्या नांदेड दौर्याची माहिती मुंबईच्या राज्य गुप्तवार्ता विभागाकडून १० ऑगस्ट रोजी येथे प्राप्त झाली होती.
१२ ते १४ ऑगस्ट दरम्यान बादल दाम्पत्य नांदेडमध्ये वास्तव्यास असल्याचे कळविण्यात आल्यानंतर स्थानिक पोलिस प्रशासनाने आवश्यक ते उपाय योजले तसेच सुरक्षा व्यवस्थाही निश्चित केली. बुधवारी येथे आलेल्या बादल दाम्पत्याचे वास्तव्य शहरातील स्कायलाइट लॉडर्स हॉटेलमध्ये होते.
गुरुवारी दुपारी साडेबारानंतर हॉटेलमधून बाहेर पडलेल्या बादल दाम्पत्याने प्रथम मालटेकडी त्यानंतर हिराघाट गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांचा ताफा पावणेदोनच्या सुमारास माता साहिब गुरुद्वारामध्ये दाखल झाला तेव्हा पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या दोन अधिकार्यांसह आवश्यक तो स्थानिक पोलीस बंदोबस्त तेथे तैनात होता.
या गुरुद्वारात प्रवेश केल्यानंतर बादल यांनी दर्शन व प्रार्थनेत १० मिनिटं घालवली. नंतर या गुरुद्वाराच्या पायर्या उतरत असताना त्यांच्या अवतीभोवती स्थानिक व अन्य ठिकाणच्या शीख बांधवांची बरीच गर्दी झाली. त्यातील काहीजणं बादल यांच्यासोबत फोटो घेण्याचा प्रयत्न करत होते. पायर्या उतरून बादल गुरुद्वारातील ‘पायधुनी’मधून बाहेर पडत असतानाच निळ्या पेहरावातील शीखधर्मीय इसमाने त्याच्या हातातील धारदार खंजरने बादल यांच्या छातीवर वार करण्याचा प्रयत्न केला, असे केंद्रे यांच्या जबाबात नमूद करण्यात आले आहे.
पो.नि.केंद्रे यांनी बादल यांच्यावरील हल्ला परतवून लावल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेतील अधिकारी-कर्मचारी धावत बचावासाठी आले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने बादल यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तत्काळ गाडीमध्ये बसवून यशोसाई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले. आरोपीसोबतच्या झटापटीत केंद्रे यांच्या उजव्या हाताच्या तळहाताला व एका बोटाला खंजरचा मार लागला. त्यांच्यावरही यशोसाई रुग्णालयात उपचार करण्यात आले.
माता साहिब गुरुद्वारातील गुरुवारच्या घटनेत धाडस आणि शौर्य दाखविणारे एसपीयूचे पोलीस निरीक्षक संतोष वैजनाथ केंद्रे यांच्याबद्दल बादल कुटुंबीयाने कृतज्ञता व्यक्त केली आहे. सुखबीरसिंग बादल यांच्या पत्नी खा.हरसिमरत कौर यांनी यशोसाई रुग्णालयात उपचार घेणार्या केंद्रे यांची प्रत्यक्ष भेट घेतली. सुखबीरजी यांचे रक्षण करण्यासाठी स्वतःच्या जीवाची परवा न करता तुम्ही दाखवलेले धाडस म्हणजे स्वतःपेक्षा कर्तव्याला आणि भीतीपेक्षा धैर्याला प्राधान्य देणारे होते ते आम्ही कधीही विसरणार नाही, असे श्रीमती बादल यांनी नमूद केले. यशोसाई हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आणि कर्मचार्यांचेही त्यांनी आभार मानले.