नांदेड, पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमधील अतिवृष्टीमुळे पीक, पशुधन आणि लहान-मोठ्या मालमत्तांच्या नुकसानीचे धक्के ग्रामीण न भागाला तीव्रपणे बसले. त्यानंतर आता भूगर्भातील हालचालींमुळे निर्माण होणारे धक्के बसू लागले असून त्याची सुरुवात भोकर तालुक्यातील पांडुरणा या गावात शुक्रवारी झाली. त्यापाठोपाठ शनिवारी भोकर शहराच्या काही भागातही हादरे जाणवले; पण त्यामुळे घाबरुन न जाता सतर्कता राखण्याचेआवाहन जिल्हा प्रशासनाने केले.
भोकर तालुक्यातील पांडुरणा गावात शुक्रवारी सायंकाळनंतर या गावाच्या पूर्व आणि पश्चिम भागात भूगर्भातून आवाज जाणवल्यामुळे गावकरी भयभीत झाले होते. ही माहिती प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर तपासले असता पांडुरणा गावामध्ये धक्क्याची कुठलीही नोंद नसल्याचे दिसून आले. स्वरातिम भूगर्भशास्त्र विभागानेही खातरजमा केली असता गंभीर असे काही आढळले नाही.
पांडुरणा येथील प्रकाराची शनिवारी सर्वत्र चर्चा सुरू असतानाच भोकर शहराच्या काही भागांमध्ये जमिनीतून आवाज आल्याचा व जमीन हादरल्याचा अनुभव तेथील लोकांना आला. विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागात या धक्क्याची नोंद रिश्टर स्केलवरती १.१ एवढी होती. त्याचा केंद्रबिंदू बोरवाडी जवळ असल्याचे प्रा.डॉ.टी. विजयकुमार यांनी जिल्हा आपत्कालीन केंद्रास कळविले.
हा धक्का अतिसौम्य प्रकारचा होता. अशा पद्धतीने कंपन हे अतिवृष्टीमुळे भूजलात होणाऱ्या पुनर्भरण अथवा उपश्यामुळे होणाऱ्या दबावामुळे होते, असे टी. विजयकुमार यांचे म्हणणे आहे. तसेच छतावरील पत्रे व दगड काढून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.