E-buses are running at a loss of Rs 13 per kilometer
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : आतापर्यंत फक्त नांदेड आगारातील चार्जिंग स्टेशन सुरू झाले आहे. अन्य काही ठिकाणचे काम सुरू आहे. तूर्त नांदेडसाठी ३० ई-बसेस उपलब्ध झाल्या असून त्या ३०० किलोमीटर हद्दीपर्यंत धावत आहेत; परंतु त्यांचा तोटा प्रत्येक किलोमीटरमागे १३ रुपये एवढा आहे.
नांदेडसाठी उपलब्ध झालेल्या ई-बसेस पैकी काही ९ मीटर लांबीच्या आहेत, ज्या २०० किलोमीटरपर्यंत धावू शकतात. तर ज्या बसेस १२ मीटर लांबीच्या आहेत, त्या ३०० किलोमीटरप्रयंत धावतात. त्यामुळे नांदेड येथून ३०० किलोमीटरपेक्षा कमी अंतर असलेल्या उमरगा, लातूर, बीड, सोलापूर, यवतमाळ व यासारख्या शहरांसाठी धावतात, अशी माहिती नांदेड आगारातून प्राप्त झाली. या सर्व बसेस पूर्णपणे वातानुकूलित आहेत, असे असतानाही अपेक्षित प्रवासी या बसेसना मिळत नाहीत.
पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर यासारख्या लांबपल्ल्यांच्या शहरांसाठी चांगला प्रतिसाद मिळू शकतो, परंतु खासगी कंपन्यांच्या धर्तीवर सेवा देणे भाग पडते. शिवाय ३०० पेक्षा अधिक अंतर कापण्याची क्षमता असलेल्या बसेस उपलब्ध कराव्या लागतील. तसेच जिल्ह्याच्या सीमेवरील आगारांच्या हद्दीत चार्जिंग स्टेशन कार्यान्वित करण्याची गरज आहे. मागील अनेक दिवसांपासून चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम विविध आगाराच्या ठिकाणी सुरु आहे.
तूर्त नांदेडमध्ये चार्जिंग स्टेशन कार्यान्वित झाले असून एका बसला चार्ज होण्यासाठी साधारण २ तास लागतात. नांदेडच्या चार्जिंग स्टेशनवर एका वेळी ९ बसेस चार्ज करण्याची व्यवस्था आहे. येथे नांदेड आगाराच्या अखत्यारितील ई-बसेसशिवाय बाहेरुन येणाऱ्या लातूर, उमरगा, सोलापूर, यवतमाळच्या बसेस सुद्धा येथे चार्ज केल्या जातात. येत्या काळात प्रत्येक जिल्ह्यात अनेक चार्जिंग स्टेशन उपलब्ध होतील, अशी आशा आहे.
खर्चाच्या तुलनेत उत्पन्नाचे प्रमाण मात्र अद्याप व्यस्त आहे. सदर बसेस पूर्णपणे वातानुकूलित असूनही त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. या बसेसना एक किलोमीटर धावण्यासाठी ७३ रुपये खर्च येतो; परंतु उत्पन्न ६० रुपये होते. परिणामी प्रतिकिलोमीटर १३ रुपयांचे नुकसान एस.टी. महामंडळ सहन करते आहे.