Durga idol immersion Godavari river
उमरी : गेल्या दहा दिवसापासून परिसरातील भाविक भक्तांनी दुर्गा मातेची उत्साहाने पूजा केली. गुरुवारी विजयादशमीचा आनंदोत्सव साजरा केल्यानंतर शुक्रवारी (दि. 3) उमरी व नायगाव परिसरातील दुर्गा मातेचे श्रीक्षेत्र राहेर येथील गोदावरी नदीच्या पात्रात विसर्जन करण्यात आले.
रात्री बारा वाजेपर्यंत गोदावरी नदीला पूर होता. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने विशेष काळजी घेऊन परिसरातील दुर्गा मातेचे विसर्जन केले. मात्र अवघ्या पाच ते सहा तासात गोदावरी नदीचा पूर ओसरला आणि शनिवारी सकाळी अक्षरशः गोदावरी मातेच्या मूर्ती उघड्या पडल्या. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भक्ती भावाने पूजा करून दुर्गा मातेचे उत्साहाने विसर्जन झाले. परंतु गोदावरी नदीचा पूर ओसरल्याने विसर्जन केलेल्या दुर्गामाता उघड्या पडल्या आहेत.
या संदर्भात उमरी नगर परिषदेतील कर्मचारी गणेश मदने यांच्याशी संपर्क साधला असता उघड्या पडलेल्या दुर्गा माता उमरी भागातील नाहीत. कारण उमरी भागातील सर्वच दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन क्रेनच्या साह्याने करण्यात आले. त्यामुळे या उघड्या पडलेल्या दुर्गा माता मूर्ती नायगाव भागाकडील असल्याचे त्यांनी सांगितले.