नांदेड : काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे 2017 मधील जाहीरनाम्याची तंतोतंत उचलेगिरी आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकासनाम्यात प्रचंड चुका आहेत. जाहीरनाम्यातच संकल्पना नसलेल्या विरोधकांना खा. अशोकराव चव्हाण यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. पातळी सोडून टीका करणाऱ्या विरोधकांवर या निवडणुकीच्या निमित्ताने संक्रांत आल्याशिवाय राहणार नाही, असे स्पष्ट मत माजी मंत्री डी.पी. सावंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
आयटीआय परिसरातील भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातील मसुद्यावर चौफेर हल्ला चढविला. मी बोलतो, ते करतो हा अशोकरावांचा बाणा आहे. भाजपाने महाराष्ट्रात प्रथमच नांदेड येथे संकल्पनामा जाहीर केला. त्यानंतर विरोधकांकडून वैयक्तिक टीका होत आहे.
जाहीरनाम्यातील योजना, काही मते सारखी असू शकतात, परंतु एखाद्या नेत्याचे मनोगत जसेच्या तसे कट, कॉपी पेस्ट करणे म्हणजे जनतेची दिशाभूल आहे. 2017 मधील खासदार अशोकराव चव्हाण यांचे मनोगत काँग्रेसने कुठलाही बदल न करता जसेच्या तसे छापून टाकले.
राष्ट्रवादी काँग्रेसचाही विकासनामा यापेक्षा काही वेगळा नाही. जाहीरनाम्यात आश्वासने कमी आणि शिमगा जास्त अशी परिस्थिती आहे. 16 पानांच्या या जाहीरनाम्यात सहा पानांवर निव्वळ चव्हाण यांच्यावर टीका, टिपण्णी केली आहे. जाहीरनाम्यात विकासाची संकल्पना मांडायची असते. परंतु, अशा जाहीरनाम्यातून जनतेने काय बोध घ्यावा व अशा पक्षावर काय विश्वास ठेवावा, हा प्रश्न पडतो, असेही डी.पी. सावंत म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जनतेचा विश्वास असून खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात नांदेड महापालिकेवर प्रथमच भाजपाची सत्ता येणार हे निश्चित आहे, असा विश्वास माजी मंत्री डी.पी. सावंत यांनी व्यक्त केला. सत्ता आल्यावर केंद्रांकडून नांदेड मनपाला 50 हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याची माहितीही सावंत यांनी दिली. या वेळी चैतन्यबापू देशमुख, किशोर देशमुख, संतोष पांडागळे, शीतल खांडील आदींची उपस्थिती होती.