Diwali dawn feast at Bandaghat from today
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : तेरा वर्षापासून जिल्हा प्रशासन, गुरुद्वारा बोर्ड, नांदेड-वाघाळा शहर महापालिका आणि नागरी सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील बंदाघाट येथे दिवाळी पहाट हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यावर्षी दि. २० ते २२ ऑक्टोबर दरम्यान दिवाळी पहाटचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. प्रख्यात गायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम हे यावर्षीचे दिवाळी पहाटचे आकर्षण असणार आहे.
दि.२० रोजी सकाळी साडेपाच वाजेपासून पद्मश्री अनुराधा पौडवाल यांचे सुश्राव्यगायन होणार आहे. यात भावगिते, भक्तीगिते, चित्रपट गिते त्या सादर करणार आहेत. प्रख्यात निवेदक डॉ. नंदकुमार मुलमुले यांची संकल्पना असलेला हा कार्यक्रम असून ते स्वतः या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजता संकल्पना व निवेदन बापू दासरी यांच्या पुढाकारातून रागरंग हा विविध वाद्य आणि गझल यांचे फ्युजन असलेला आगळावेगळा कार्यक्रम सादर होणार आहे. यात मिलिंद तुळणकर-पुणे, कल्याणी देशपांडे-पुणे, प्रकाश सोनकांबळे, ऐनोद्दीन वासरी, डॉ. गुंजन शिरभाते, सौ. आसावरी जोशी (रवंदे), बालासाहेब पाटील हे मान्यवर कलावंत सहभागी होतील.
रात्री साडेआठ वाजता नृत्य दिग्दर्शिका डॉ. सान्वी जेठवानी यांच्या संचाचा नृत्य झंकार हा कार्यक्रम सादर होणार आहे. दि.२१ रोजी पहाटे साडेपाच वाजता निवेदक प्रा. सुनिल नेरलकर यांच्या पुढाकारातून पं. जसराज यांच्या शिष्योत्तमा अंकिता जोशी यांचा शास्त्रीय संगीतावरील आध-रात्री ारीत स्वर सरिता हा कार्यक्रम होणार आहे.
दि. २२ रोजी सकाळी साडेपाच वाजता संकल्पना व निवेदन अॅड. गजानन पिंपरखेडे यांच्या पुढाकारातून व पत्रकार विजय जोशी यांच्या निर्मितीतून १९६० ते १९८० या काळातील मराठी चित्रपटांच्या सुवर्णकाळात गाजलेल्या मराठी गितांचा रुपेरी सोनसळा हा कलांगण प्रतिष्ठाण प्रस्तूत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी साडेपाच वाजता जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या संकल्पनेतून व सुरेश जोंधळे व मकरंद दिवाकर यांच्या सहकार्यातून काफीला, कोल्हापूर निर्मित जियारत हा मराठी, हिंदी, उर्दू प्रेम साहित्यांची संगीतमय प्रेमयात्रा हा कार्यक्रम सादर होणार आहे.