Nanded new hospital project pudhari photo
नांदेड

Nanded new hospital project : नांदेडच्या शासकीय रुग्णालयाच्या नव्या इमारतीच्या प्रस्तावास मंजुरी!

‘एडीबी’चे अर्थसाहाय्य : शासनाचा मोठा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

विशेष प्रतिनिधी

नांदेड : मागील अनेक वर्षांपासून रखडलेली जिल्हा सामान्य रुग्णालयाची नवीन इमारत तसेच प्रस्तावित रुग्णालयातील सुमारे ६०० पदांसह इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला असून ५०० खाटांचे हे रुग्णालय शहराच्या मध्यवर्ती भागात उभारले जाणार आहे.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याच्याशी संलग्न रुग्णालय एक तपापूर्वी शहराबाहेर विष्णुपुरी परिसरातील नव्या जागेत स्थलांतरित झाल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या नियंत्रणाखालील सामान्य रुग्णालयाला घरघर लागली. या रुग्णालयाची जुनी इमारत कालबाह्य झाल्यामुळे काही वर्षांपूर्वी पाडण्यात आली. तेव्हापासून नव्या-सुसज्ज इमारतीसाठी निधी आणि मंजुरीची प्रतीक्षा केली जात होती. राजकीय पातळीवरील पाठपुराव्यानंतर यासंबंधीचा शासन आदेश मराठवाडा मुक्तिदिनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जारी करण्यात आला.

शासनाच्या या निर्णयाची माहिती सर्वप्रथम खा.अशोक चव्हाण यांच्या यंत्रणेने जाहीर केली. याबाबत रुग्णालयाशी संबंधित अधिकार्‍यांकडून माहिती घेतली असता प्रस्तावित इमारतीमध्ये ३०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय स्थापण्याचा प्रस्ताव आधी शासनाकडे गेला होता. पण दोन वर्षांपूर्वी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील बालमृत्यूचे प्रकरण राज्यभर गाजल्यानंतर वैद्यकीय शिक्षण तसेच आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी नांदेडला भेट दिली होती. वरील रुग्णालयावर पडणारा ताण लक्षात घेऊन शहरामध्ये ५०० खाटांचे नवे रुग्णालय उभारण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे.

नागरिकांना शहरामध्ये चांगले व दर्जेदार उपचार व वैद्यकीय सेवा मिळावी या हेतुने वरील रुग्णालयाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या रुग्णालयासाठी ५९४ पदे लागणार असून त्या पदांना तसेच या पदांच्या वेतनासाठी अपेक्षित असलेल्या खर्चालाही शासनाने मंजुरी दिली आहे. राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवांचे जाळे बळकट करण्यासाठी आशियाई विकास बँकेच्या मदतीतून सुमारे साडेचार हजार कोटी रूपये खर्चाचा ‘प्रगती प्रकल्प’ राबविण्यात येणार आहे. त्यातूनच नांदेडच्या नव्या सामान्य रुग्णालयाची उभारणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

नांदेड जिल्ह्यातील आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेनेचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावल्याबद्दल शिवसेना आमदार आनंद बोंढारकर व बालाजी कल्याणकर यांनी आनंद व्यक्त केला. आ.कल्याणकर यांच्या प्रयत्नातून नांदेड उत्तर मतदारसंघात लिंबगाव रस्त्यावर उप जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे संपूर्ण काम पूर्ण झाले असले, तरी त्यास उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. या रुग्णालयात १०० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर आता नांदेड दक्षिण मतदारसंघात जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी नवीन-सुसज्ज इमारत बांधण्याचा प्रस्ताव मार्गी लागला. खा.चव्हाण यांनीही सर्व संबंधितांचे आभार मानले आहेत.

  • राज्यशासनाने नांदेडसोबतच कोल्हापूर येथेही ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय मंजूर केले आहे. नागपूर व लातूर येथे १०० खाटा असलेल्या जिल्हा रुग्णालयांचा ३०० खाटांपर्यंत विस्तार केला जाणार असून पुणे येथे २०० खाटांचे विशेषोपचार संदर्भसेवा रुग्णालय वरील प्रकल्पांतर्गत मार्गी लावले जाणार आहे. या सर्व रुग्णालयांसाठी नव्या पदांनाही मंजुरी देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT