Digital arrest scam pudhari photo
नांदेड

Digital Arrest : डिजिटल अरेस्ट करण्याची भीती दाखवून प्राध्यापकाची ५१ लाखांची फसवणूक

नांदेडच्या सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Digital Arrest: Professor defrauded of ₹51 lakh after being threatened with 'digital arrest'

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : डिजिटल अरेस्ट, मनी लाँड्रिग आणि टेरर फंडिंगच्या जाळ्यात अडकवून बसवेश्वर नगर (जुना कौठा) येथील एका ५६ वर्षीय प्राध्यापकाची तब्बल ५१ लाख ३४ हजार ८५६ रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहन लक्ष्मणराव घईनवाड (वय ५६, रा. बसवेश्वर नगर, जुना कौठा, नांदेड) यांना १७ जुलै रोजी सकाळी १० च्या सुमारास भामट्यांनी फोन केला. आरोपी व त्याच्या साथीदारांनी स्वतःचे आर्थिक फायदे मिळवण्याच्या उद्देशाने संगनमत करून बनावट ओळख निर्माण केली. आपण 'डेटा प्रोटेक्शन बोर्ड, मुंबई'चे कार्तिक यादव, आर. के. चौधरी तसेच पोलीस विभागाचे प्रदीप जयस्वाल, विश्वास नांगरे पाटील आणि सुजल रॉय बोलत असल्याचे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.

तुमच्या नावाने मनी लाँड्रिग व टेरर फंडिंग सुरू असून तुम्हाला 'डिजिटल अरेस्ट' करण्यात येत आहे, अशी तीव्र भीती आरोपींनी फिर्यादीला दाखवली. या कायदेशीर कारवाईच्या धाकापोटी आरोपींनी वेगवेगळ्या खात्यांवर ऑनलाईनद्वारे ५१ लाख ३४ हजार ८५६ रुपये भरण्यास भाग पाडले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मोहन घईनवाड यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वसंत सप्रे हे करीत आहेत.

पोलिसांचे आवाहन

कोणताही पोलीस विभाग किंवा शासकीय संस्था फोन अथवा व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलवरून 'डिजिटल अरेस्ट' करत नाही. असा कोणताही कॉल आल्यास घाबरून न जाता तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT