nanded Dhondge's Shiv Sena result search political alternative
विशेष प्रतिनिधी
नांदेड : शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष ते स्वतःचा पक्ष असा अनेक पक्षांमध्ये राजकीय प्रवास केल्यानंतर लोहा कंधार मतदारसंघाचे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नव्या राजकीय पर्यायाच्या शोधातून शिवसेनेमध्ये मुक्कामी जाण्याची विचार केला असून यासंदर्भात त्यांच्या समर्थकांची बैठक येत्या रविवारी होणार आहे.
२००९ ते २०१४ या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहिलेल्या धोंडगे यांनी तीन वर्षांपूर्वी तेलंगणातील भारत राष्ट्र समितीत प्रवेश करून या पक्षाला महाराष्ट्रात उभारी देण्याचा प्रयत्न केला; पण मूळ राज्यातच या पक्षाची धूळधाण उडाल्यामुळे महाराष्ट्रातील अस्तित्व संपले. त्यानंतर शंकर धोंडगे यांनी राज्यात एक आघाडी बांधली. पक्षही स्थापन केला; पण महायुतीच्या झंझावातात त्यांचा टिकाव लागला नाही. मागील काही महिने नव्या राजकीय पर्यायांचा विचार केल्यानंतर सत्तेमधील पक्षासोबत राहून आपला विचार, आपले काम पुढे नेले पाहिजे, असे म्हणणे समर्थकांनी रेटल्यानंतर धोंडगे नवा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
शिवसेनेचे प्रमुख नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शंकरअण्णा धोंडगे यांनी आपले सहकारी दत्ता पवार यांच्यासह नुकतीच भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या भेटीचे छायाचित्र समाजमाध्यमांत जारी होताच, धोंडगे यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा जिल्ह्यामध्ये सुरू झाली. मुंबईतील भेट आटोपल्यानंतर धोंडगे आपली कर्मभूमी कंधारमध्ये परतले आहेत. समाजमाध्यमांतून बाहेर आलेली माहिती त्यांनी फेटाळली नाही; पण अंतिम निर्णय झाला नसल्याचे सांगत, येत्या रविवारी (दि.८) आमची बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याच बैठकीत त्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
काही महिन्यांपूर्वी आधी काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण आणि त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शंकरअण्णांची नांदेडमध्ये भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी धोंडगे, त्यांचे दोन पुत्र आणि समर्थक काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असे सांगितले जात होते. पण धोंडगे यांच्या बहुसंख्य समर्थकांनी वेगळा सूर लावला. सत्तेमधील पक्षासोबत आपण राहिले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यातून धोंडगे यांनी शिवसेनेसोबत बोलणी केली असावी, असे मानले जात आहे.
धोंडगे यांचे राजकीय विरोधक प्रताप पाटील चिखलीकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असून या पक्षाचे ते जिल्ह्यातील सर्वेसर्वा झाले आहेत. त्यांना त्यांच्याच पातळीवर शह देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आवश्यक ते बळ मिळणार नाही, हे लक्षात घेऊन धोंडगे यांनी शिवसेनेचा पर्याय स्वीकारला असावा. शिंदे यांची भेट घेण्यापूर्वी त्यांच्या पक्षाचे आमदार हेमंत पाटील यांनी धोंडगे यांची भेट घेतली होती. शिंदे यांच्यासोबतच्या चर्चेचा तपशील धोंडगे यांनी उघड केला नाही; पण भेट चांगली झाल्याचे नमूद केले.