नांदेड : नांदेड शहराचा वाढता विस्तार आणि विकास लक्षात घेता भविष्यातील अंतर्गत प्रवासी वाहतुकीसाठी मेट्रो ट्रेन प्रणाली विकासासाठी त्वरित व्यवहार्यता अभ्यास (फिजिबिलिटी स्टडी) करण्याची मागणी राज्यसभा सदस्य खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
या संदर्भात खा.डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्री मनोहर लाल खट्टर यांना पत्र पाठवून महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. नांदेड हे महाराष्ट्राचे दहावे मोठे शहर तर मराठवाड्यातील दुसरे सर्वात मोठे नगरीय केंद्र आहे. धार्मिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्वामुळे नांदेडला देश-विदेशातून दरवर्षी लाखो भाविक आणि पर्यटक भेट देतात.
दहावे गुरु श्री गुरु गोबिंदसिंह जी यांच्या पावन सान्निध्याने पुनीत नगरी,याच ठिकाणी गुरु महाराजांनी गुरुग्रंथ साहेबांना गुरगद्दी प्रदान केली, तसेच याच ठिकाणाहून बंदासिंघ बहादर यांना देशाच्या संरक्षणासाठी उत्तरेत पाठविले हा ऐतिहासिक वारसा आणि पवित्र गोदावरी नदी मुळे नांदेडची धार्मिक पर्यटनपटात विशेष प्रगती होत आहे.
शहराची जलद वाढती लोकसंख्या, वाहनसंख्या आणि धार्मिक पर्यटकांची सातत्याने वाढती संख्या, शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता नांदेडसाठी आधुनिक, विश्वासार्ह आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक प्रणालीची गरज अत्यंत निकडीची झाल्याचे खा. गोपछडे यांनी नमूद केले.
“नांदेडमध्ये मेट्रो ट्रेन प्रणाली अत्यावश्यक आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी तातडीने वैज्ञानिक पद्धतीने व्यवहार्यता सर्वेक्षण हाती घ्यावे,” अशी विनंती खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्र सरकारला केली आहे.
शहरातील वर्तमान व भविष्यातील वाहतूक गरजांचे मूल्यांकन
मेट्रो प्रणालीमुळे होणारे व्यापक लाभ, तांत्रिक, आर्थिक आणि प्रकल्प व्यवस्थापन संदर्भातील व्यवहार्यता, वाहतूक कोंडी कमी होणे आणि गतिशीलतेत सुधारणा यासह धार्मिक पर्यटन व स्थानिक अर्थव्यवस्थेला यामुळे मोठा फायदा होईल. मेट्रो प्रणाली उभारल्यास स्थानिक नागरिकांसह शहरात येणाऱ्या भाविकांच्या प्रवाससुविधेत मोठी क्रांती घडेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.