देगलूर : ‘स्वच्छ भारत’मिशन अभियानाच्या उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरू असताना शहरात मात्र सार्वजनिक शौचालयांच्या अभावामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अनेक भागांत शौचालये व मुताऱ्यांची कमतरता प्रामुख्याने जाणवत असून काही ठिकाणी उपलब्ध सुविधा देखील बंद अवस्थेत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
शहरातील एका लॉज समोरील सार्वजनिक मुतारी बंद करण्यात आली आहे. तर डाकघरासमोरील सुविधा अस्वच्छतेमुळे वापरण्यायोग्य राहिलेली नाही. तसेच मोंढा भागातील मार्केट कमिटीसमोरील पूर्व व दक्षिण दिशेच्या मुताऱ्यांचीही दुरवस्था झाल्याने त्या परिसरातील समस्या अधिकच तीव्र बनली आहे. परिणामी मुख्य वर्दळीच्या भागात येणाऱ्या नागरिकांसाठी पर्याय उपलब्ध नसल्याचे चित्र दिसत आहे.
काही ठिकाणी उघड्यावर लघुशंका करण्याचे प्रकार वाढल्याने अस्वच्छतेत भर पडत आहे. मुख्य बाजारपेठ, बसस्थानक परिसर, शासकीय कार्यालयांच्या आसपास तसेच शहरालगतच्या भागात सार्वजनिक मुताऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. विद्यमान सुविधा अपुऱ्या पडत असल्याने व्यापारी, प्रवासी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
विशेषतः महिलांसाठी स्वतंत्र, सुरक्षित व स्वच्छ शौचालयांची उपलब्धता नसल्याने त्यांना अधिकच गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. शहरात आधुनिक सार्वजनिक शौचालये व मुताऱ्या उभारणे, बंद पडलेल्या सुविधांची तातडीने दुरुस्ती करून त्या सुरू करणे तसेच नियमित स्वच्छता व देखभालीसाठी सक्षम यंत्रणा उभारणे अत्यावश्यक असल्याची मागणी होत आहे.
दरम्यान, स्वच्छता ही केवळ घोषणांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्षात शहरात दिसली पाहिजे; अन्यथा ‘स्वच्छ शहर’चे स्वप्न अपुरेच राहील, अशी प्रतिक्रिया देगलूरकरांतून उमटत आहेत.
नुकतेच निवडून आलेल्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी या प्रश्नाकडे प्राधान्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, शहराच्या गरजेनुसार नवीन सुविधा उभाराव्यात आणि स्वच्छतेबाबत ठोस धोरण राबवावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.