नांदेड : ऑनलाईन, फेक कॉल, बनावट ॲप, लिंक अशा विविध माध्यमातून डिजिटल फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एका बांधकाम व्यावसायिकांची एक वर्षापूर्वी एक लाख 40 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली होती. या पैकी बांधकाम व्यावसायिकाला तब्बल एक वर्षांनंतर 55 हजार रुपये वापस मिळाले मात्र, त्यांना 85 हजारांवर पाणी सोडावे लागले.
या बाबत अधिक माहिती अशी की, देगलूर तालुक्यातील लोणी येथील लक्ष्मीकांत जनार्दन चिद्रावार हे 27 जानेवारी 2025 रोजी सोशल मीडियावर व्हिडीओ पाहत असताना त्यांना एक ऑनलाईन काम करुन घरबसल्या पैसे देणारी नोकरी मिळेल अशी ऑफर असलेली जाहिरात आली. त्या जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर चिद्रावार यांना नोकरी मिळविण्यासाठी आपण जीएसटी व टॅक्स भरण्यासाठीची एक लाख 40 हजार 299 फिस भरण्यास सांगितले. त्यानुसार चिद्रावार यांनी फिस भरली. त्यानंतर चिद्रावार यांना आपली फसणूक झाल्याचे लक्षात आले.
चिद्रावार यांनी फसवणूक झाल्यानंतर तातडीने संबधिताला बँकेला माहिती दिली. तसेच मरखेल पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानंतर तातडीने 1930 या सायबर हेल्पलाईनला तक्रार नोंदवली. या तक्रारीवरुन एनसीसीआरपी सायबर क्राईम पोर्टल मार्फत तक्रारदार चिद्रावार यांच्या खात्यात आरोपींचे खाते फ्रिज करुन 55 हजार रुपये होल्ड करुन घेतले. त्यानंतर तब्बल एक वर्षानंतर आता ही 55 हजार रक्कम चिद्रावार यांना मिळाली.मात्र, चिद्रावार यांना 85 हजारांवर पाणी सोडावे लागले.
ऑनलाईन फसवणूक करणारे हे बिहार राज्यातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, चिद्रावार यांनी चुकून केलेल्या कृतीमुळे त्यांना आज 85 हजार रुपये गमवावे लागले. मात्र, तातडीने सतर्कता दाखवल्याने त्यांच्या पदरात 55 हजार मिळाले आहेत. त्यामुळे ऑनलाईन फ्रॉड, चुकीचे कॉल, ॲप, ओटीपी मागणारे, खासगी माहिती, बँकेची माहिती देण्याच्या अगोदर त्याची खात्री करावी अन्यथा फसवणूक अटळ आहे.
पोलिसांच्या मार्गदर्शक सूचना
कोणतीही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, अनोळखी एपीके फाईल मोबाईल डाऊनलोड करू नये, आपल्या मोबाईलवर आलेल्या ओटीपी, पासवर्ड, कुणालाही देऊ नये, सोशल मीडियावरील प्रलोभनांना बळी पडू नका, ऑनलाईन जाहिरातीवर विश्वास ठेवू नका, आपली वैयक्तिक माहिती ऑनलाईन देऊ नका, अकाऊंटवर टु स्टेप व्हेरिफिकेशन करून ठेवावे, अनोळखी व्यक्तिचे व्हिडीओ कॉल उचलू नये, डिजिटल अरेस्ट हा फ्रॉडला बळी पडू नका अशा मार्गदर्शक सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.