Death Certificate : ११ महिन्यांपासून मृत्यू प्रमाणपत्र रखडले file photo
नांदेड

Death Certificate : ११ महिन्यांपासून मृत्यू प्रमाणपत्र रखडले

तहसीलदारांच्या सहीअभावी फाईल पुन्हा धूळखात, भोकर तहसील कार्यालयाचा कारभार 'मृत्यू शय्येवर' ?

पुढारी वृत्तसेवा

Death Certificate Pending for 11 Months

नांदेड, पुढारी वृत्तसेवा :

सर्वसामान्य नागरिकांच्या अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक असलेले मृत्यू मिळवण्यासाठी तब्बल ११ महिने संघर्ष करावा लागत असल्याची संतापजनक बाब भोकर तहसील कार्यालयात समोर आली आहे. प्रशासनाच्या ढिसाळ, निष्क्रिय आणि बेफिकीर कारभारामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले असून, खा. अशोक चव्हाण यांच्या प्रभाव क्षेत्रातील तहसील कार्यालयाचा कारभारच आता 'मृत्यू शय्येवर' पोहोचला आहे.

लामकाणी (ता. भोकर) येथील गंगाराम इरबाजी जाधव यांच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी अर्जदार श्रीपाद लामकानीकर यांनी १० जून, २०२५ रोजी तहसील कार्यालयात रितसर अर्ज दाखल केला होता. मात्र, तब्बल १० महिने उलटूनही संबंधित प्रमाणपत्र संदर्भातील प्रक्रिया सुरू करण्यात आली नव्हती.

वरीष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधल्याने प्रशासनाला जाग आली आणि मंडळ अधिकाऱ्याने पंचनामा करून तहसील कार्यालयात ५ मे, २०२६ मध्ये अहवाल सादर केला. परंतु, पंचनामा अहवाल कार्यालयात जमा होऊन आता आठवड्याहून अधिक कालावधी उलटला असतानाही मृत्यू प्रमाणपत्रावर तहसीलदारांची सहीच होत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे संबधित फाईल पुन्हा धूळखात पडली आहे.

अर्जदार श्रीपाद लामकाणीकर यांनी तहसील कार्यालयात अनेक महिन्यांपासून पाठपुरावा केला. फो-नद्वारे संपर्क करण्याचाही प्रयत्न केला. परंतु प्रशासनाकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. प्रशासनाची ही वागणूक म्हणजे नागरिकांच्या समस्यांची थेट थट्टा असल्याची संतप्त भावना लामकाणीकर यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे "११ महिने मृत्यू प्रमाणपत्र मिळत नसेल, आता पंचनामा होऊनही आठ आठ दिवस सही होत नसेल, तर प्रशासन नेमके काम कधी व कुणासाठी करते?" असा प्रश्न निर्माण होतो.

प्रशासन जबाबदारी स्वीकारायला तयार नाही

भोकर तहसील कार्यालयातील ढिसाळ कारभाराबाबत अनेक तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. विविध विभागांतील प्रमाणपत्रे वेळेत मिळत नसल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. हा भाग मागास असल्याने गोरगरिबांना अशा निष्क्रिय प्रशासनाचा सर्वाधिक फटका बसत आहे. तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूकीच्या तक्रारीकडेही दुर्लक्ष सुरू आहे. एकीकडे नागरिकांचे मूलभूत प्रश्न महिनोनमहिने प्रलंबित ठेवले जात आहेत, तर दुसरीकडे प्रशासनाकडून कोणतीही जबाबदारी स्वीकारली जात नसल्याने तहसील कार्यालयाचा कारभार आता मृत्यू शय्येवर पोहोचला आहे.

तससीलदार फोनच घेत नाहीत

संबधित मृत्यू प्रमाणपत्र अर्ज ११ महिन्यांपासून प्रलंबित आहे. आत्ता कुठे पंचनामा होऊन ५ मे, २०२६ रोजी अहवाल सादर करण्यात आला. त्यास आठ दिवस उलटून गेले असले तरी १२ मे, मंगळवार पर्यंत अर्जदारास प्रमाणपत्र मिळालेले नाही. यासंदर्भात तहसीलदार यांना दैनिक पुढारीने संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसादच दिला नाही. तेव्हा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी भोकर तहसील कार्यालयाच्या कारभारावर विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT