Dam Water Drought Pudhari
नांदेड

Nanded News: नांदेडची धरणं होत आहेत रिकामी, केवळ २३ टक्केच जलसाठा; आता आशा आर्द्रा नक्षत्राकडून

आर्द्राकडून आशा : विष्णुपुरी प्रकल्पात केवळ २३ टक्केच जलसाठा

पुढारी वृत्तसेवा

Nanded Dam Water Level Rain Update

नांदेड, पुढारी वृत्तसेवा: मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ९ टक्के पाऊस कमी झाला आहे. मृग जवळपास कोरडा गेला. रविवारी सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करत असून या नक्षत्राकडून मोठ्या अपेक्षा आहेत. गोदावरीच्या लाभक्षेत्रात मे आणि जूनमध्ये आजवर जो पाऊस झाला, त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पाच्या जलसाठ्यात किरकोळ वाढ झाली असून सध्या २३.६८ टक्के साठा आहे. अन्य सर्व जलसाठ्यात ५० टक्यांपेक्षा कमी जलसाठा आहे.

यावर्षी मे महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. मान्सूनपूर्व पडलेल्या या पावसाने अपेक्षे बरोबर भीतीही वाढवली होती. पण, आता भीती खरी ठरली आहे. वास्तविक नांदेड जिल्ह्याचा पावसाचा इतिहास पाहता जुलैच्या मध्यानंतरच खऱ्या अथनि पावसाला सुरुवात होते. गतवर्षी सुद्धा १९ जुलै नंतर पावसाने जो जोर पकडला तो ऑक्टोबरपर्यंत कायम होता. सरासरी एवढ्या पावसाची नोंद झाली. सर्व जलाशय पूर्णपणे भरले होते. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची फारशी टंचाई जाणवली नाही.

या पावसाळ्यात सुरुवातीपासून पावसाचा जोर चांगला राहील, असा तज्ज्ञांचा अंदाज होता. त्यानुसार मान्-सूनचे आगमन तुलनेने लवकर झाले. परंतु नंतर त्याच्या प्रवासात अनेक अडथळे आहे. आता जून अंतिम टप्प्यात आहे. मृगनक्षत्र संपत आले. रविवारी आर्द्रा नक्षत्राला प्रारंभ होतो आहे. वाहन उंदीर असल्याने या नक्षत्राकडून मोठ्या अपेक्षा आहेत. विशेषतः सर्व जलाशयातील साठ्यांमध्ये वाढ होणे नितांत गरजेचे आहे. मोठ्या व मध्यम प्रकल्पातील जलसाठे चिंताजनक स्थितीत आहेत.

पेरणीसुद्धा खोळंबली असून २५ टक्केसुद्धा पेरणी झालेली नाही. आषाढीनिमित्त दिंडी पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. परंतु बळीराजाचा जीव टांगणीला लागला आहे. काही ठिकाणी पाणी उपलब्ध असले तरी महावितरण कंपनीच्या अवकृपेने केलेली पेरणी संकटात सापडली आहे. तर बहुतांश भागात पेरणी करण्याची हिम्मत शेतकरी करु शकलेला नाही. प्रशासनाच्यावतीने वाट पहाचा संदेश वारंवार दिला जात असल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

गतवर्षी जूनच्या २० तारखेपर्यंत ७८.४० मिलीमीटर अर्थात अपेक्षित सरासरीच्या ७५.६८ टक्के पाऊस झाला होता. यंदा त्यापेक्षाही कमी पावसाची नोंद झाली आहे. आजवर केवळ ६९ मिलीमीटर म्हणजे ६६.६० टक्के पाऊस पडला. किमान १०० मिलीमीटर पाऊस सर्वद्र पडल्याशिवाय पेरण्या करणे धोकादायक असल्याचे मानले जाते. यंदा केवळ लोहा तालुक्यात ११८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. अन्य तालुक्यात ९० मि.मी. पेक्षा कमी पावसाची नोंद आहे.

जिल्ह्यात एकूण ९ मध्यम प्रकल्प असून त्यापैकी ३ जलाशयांत ७५ टक्क्यांपेक्षा कमी दोन मध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी तर ४ जलाशयांत २५ टक्क्‌यांपेक्षा कमी साठा आहे. ९ उच्च पातळी बंधाऱ्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. ८० लघु प्रकल्पांपैकी केवळ १ शंभर टक्के भरला आहे.

जलाशयांतील सद्यस्थितीची टक्केवारी

विष्णुपुरी प्रकल्प - २३.६८

अपर मानार (लिंबोटी) २६.५६

लोअर मानार (बारुळ) ५०.६३

इसापूर (जि. वाशिम) ४३.२०

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT