घरकुलाची प्रलंबित देयके तसेच मनरेगाची थकीत मजुरी देण्यासाठी ‌‘माकप‌’नेे पंचायत समिती कार्यालयावर घेराव आंदोलन केले. pudhari photo
नांदेड

‌CPM protest : ‘माकप‌’समोर पं.स.नमली

लेखी आश्वासनानंतर ‌‘माकप‌’चे किनवटमध्ये आंदोलन मागे

पुढारी वृत्तसेवा

किनवट ः पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांची प्रलंबित देयके तसेच मनरेगाअंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक कामांची थकीत मजुरी तातडीने देण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मंगळवारी पंचायत समिती कार्यालयावर बेमुदत घेराव आंदोलन करण्यात आले. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक कामे सुरू करून मजूर व शेतकऱ्यांच्या हाताला रोजगार द्यावा, अशीही ठाम मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनाची सुरुवात रेल्वे स्टेशन परिसरातून काढण्यात आलेल्या रॅलीने झाली. रॅली पंचायत समिती कार्यालयावर धडकल्यानंतर जोरदार घोषणाबाजीसह घेराव आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात सर्व मंजूर घरकुल लाभार्थ्यांची प्रलंबित देयके विनाविलंब अदा करावीत, केंद्र व राज्य सरकारने घरकुल अनुदानाची रक्कम सध्याच्या दोन लाख दहा हजार रुपयांप्रमाणे सर्वांना लागू करावी व भविष्यात ती पाच लाखांपर्यंत वाढवावी, मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या कामांची कुशल व अकुशल मजुरी त्वरित देण्यात यावी, बंद असलेली सार्वजनिक व वैयक्तिक लाभाची कामे पुन्हा सुरू करावीत, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.

यासोबतच तालुक्यातील अंतिम पैसेवारी 50 टक्क्यांपेक्षा (36 टक्के) कमी घोषित झाल्यामुळे, मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक कामे सुरू करावीत, मनरेगा योजना पूर्ववत अधिक सक्षमपणे राबवावी, ग्रामीण भागातील शासकीय नकाशावरील सर्व पाणंद रस्त्यांची कामे तातडीने हाती घ्यावीत, बांधकाम कामगारांना लागणारी 90 दिवसांची प्रमाणपत्रे ग्रामपंचायत स्तरावर ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या सहीने देण्याची व्यवस्था करावी, तसेच रोजगार सेवकांना शासन निर्णयानुसार वाढीव मानधन देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

या मागण्यांच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे यांच्याशी माकपच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली. मागण्या सकारात्मक पद्धतीने सोडविण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले.

या आंदोलनात जनार्दन काळे, शैलीया आडे, खंडेराव कानडे, शेषराव ढोले, सीताराम आडे, राम कनडेल, मोहन जाधव, मनोज सल्लावार, सुदाम बर्गे, साईनाथ राठोड, प्रशांत जाधव, रंगराव चव्हाण, इंदल राठोड, फरीद बाबा आदी सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने राहुल नाईक यांनी तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनेश कांबळे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT