Congress Pudhari
नांदेड

Congress : सातत्याने तक्रारी करणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर कार्यवाहीची टांगती तलवार !

पक्षाच्या बदनामीचा ठपका; नव्या कार्यकारिणीतून वगळणार

पुढारी वृत्तसेवा

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : वारंवार पत्रकबाजी करून पक्षांतर्गत सुरु असलेल्या घडामोडी तसेच महत्वाच्या बाबी चव्हाट्यावर आणून पक्षाची बदनामी करणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांना काँग्रेसच्या नवीन कार्यकारिणीतून डिच्चू मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. येत्या 30 तारखेपर्यंत नवीन कार्यकारिणी जाहीर होणार असल्याने कोणाची उचलबांगडी होणार आणि कोणाची वर्णी लागणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये गटबाजीला उधाण आले आहे. परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांचे तोफ डागण्याचे प्रकार वाढले आहेत. पक्षश्रेष्ठींकडे वारंवार लेखी तसेच तोंडी तक्रारी करून खुन्नस काढली जात आहे. संघटन सृजन अभियानांतर्गत जिल्ह्यात पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी अ.भा. काँग्रेस कमिटी तसेच प्रदेश कार्यालयातून सातत्याने सूचना दिल्या जात होत्या. परंतु जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीनंतर पक्षातील असंतुष्ट कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काही प्रमुख नेत्यांवर आगपाखड करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते.

पक्षातील एका गटाने काही दिवसांपूर्वी दिल्लीवारी करून केंद्रीय नेतृत्वाकडेही लेखी तक्रार करून आपले गाऱ्हाणे मांडले होते. त्यानंतरही तक्रारींचे हे सत्र सुरुच आहे. जिल्ह्यात सध्या विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची रणनिती आणि महत्त्वाच्या बाबींवर पक्षश्रेष्ठी बारीक लक्ष ठेवून आहे. अशा परिस्थितीत पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करणे अपेक्षित असताना काही महत्त्वाचे विषय सार्वजनिक करून पक्षशिस्तीचा भंग होईल, असे प्रकार श्रेष्ठींच्या निदर्शनास आल्याचे समजते. अशा पदाधिकाऱ्यांवर श्रेष्ठींकडून कार्यवाही होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मुंबईत नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत नवीन जिल्हा कार्यकारिणीवरही चर्चा झाल्याचे समोर आले आहे. 30 जूनपर्यंत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी प्रदेशाध्यक्षांनी मुदत दिली आहे. या कार्यकारिणीतून काही जुन्या पदाधिकाऱ्यांना वगळण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. पक्षहितासाठी व संघटन मजबुतीसाठी सक्रीय राहणाऱ्या नव्या आणि उमद्या चेहऱ्यांनाच कार्यकारिणीत स्थान देण्याच्या सूचनाही आहेत.

पक्षांतर्गत मतभेद, गटबाजी दूर करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्यावतीने अभियान राबविले होते. परंतु या अभियानाचा जिल्ह्यात काहीही फरक पडलेला दिसत नाही. उलट गटबाजी चव्हाट्यावर आणली जात आहे. पक्षाची शिस्त कायम राखण्यासाठी श्रेष्ठींकडून कठोर निर्णय घेतला जाणार असल्याने काही पदाधिकाऱ्यांवर कार्यवाहीची टांगती तलवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT