

विशेष प्रतिनिधी
नांदेड : विधान परिषद प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे तब्बल ९२ नगरसेवक नेमके कुठे आहेत? आणि ते मतदान कुणाला करणार आहेत? हा प्रश्न जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. काँग्रेसने वि. प. निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी माघारी घेतल्यानंतर काँग्रेसवर टीका होत असताना, संघटन सृजन अभियानातून नियुक्त झालेल्या नव्या जिल्हाध्यक्षांसमोर ही निवडणूक पहिली मोठी अग्निपरीक्षा मानली जात आहे.
भाजपच्या संपर्कात काही नगरसेवक असल्याच्या चर्चांमुळे आणि पक्षांतर्गत अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे संघटन, नेतृत्व आणि निष्ठावंत मतदारांवरील पकड यांची खरी कसोटी या निवडणुकीत लागणार आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडे तब्बल ९२ नगरसेवक मतदारांचे संख्याबळ असताना पक्षाने निवडणुकीत आक्रमक भूमिका का घेतली नाही, हा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे. दुसरीकडे या ९२ पैकी अनेक नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. काही नगरसेवक भाजप पुरस्कृत सहलीवर गेल्याचीही कुणकुण असल्याने काँग्रेसची चिंता वाढली आहे.
संघटन सृजन अभियानातून नुकतीच नियुक्ती झालेल्या काँग्रेसच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेतृत्व असलेल्या दक्षिणचे खा. रवींद्र चव्हाण यांच्यावर जिल्ह्यातील सर्व नगरसेवकांना एकत्र ठेवण्याची जबाबदारी आहे. मात्र, आजपर्यंत त्यांनी ९२ नगरसेवकांची एकत्रित बैठक घेतली का, आणि हे सर्व नगरसेवक महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांनाच मतदान करणार का, असे थेट प्रश्न आता समाजमाध्यमांवर उपस्थित होत आहेत.
मुदखेड, हदगाव आणि हिमायतनगर भागातील काँग्रेस नगरसेवकांची जबाबदारी आता खा. चव्हाण यांच्या सोबतच जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे यांच्यावरही आहे. त्यामुळे या दोन्ही नव्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाची खरी कसोटी विधान परिषद निवडणुकीत लागणार आहे. संघटन सृजन अभियानातून उभे केलेले संघटन प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी किती सक्षम ठरते, याकडे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, देगलूर येथील सर्व १३ नगरसेवक महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच मतदान करतील, असा विश्वास स्थानिक काँग्रेस नेते रामदास पाटील सुमठाणकर यांनी व्यक्त केला आहे. अर्धापूर व भोकर येथे काँग्रेस शून्यावर असून मुदखेड येथे काँग्रेसचे चार नगरसेवक आहेत. नायगाव, कंधार, येथील काँग्रेस नगरसेवकांची जबाबदारी खा. रवींद्र चव्हाण यांच्यावरच असणार आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, या निवडणुकीत काँग्रेसचे नगरसेवक जर भाजपचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांच्या बाजूने मतदान करताना दिसले, तर तो केवळ पराभव ठरणार नाही; तर काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानावरच प्रश्नचिन्ह उभे राहील. नव्या नेतृत्वाच्या कार्यक्षमतेवरही गंभीर शंका उपस्थित होतील, असे या पक्षातूनच बोलले जात आहे.
ठळक फरक!
वरील निवडणुकीतील बहुतांश नगरसेवक आपापल्या कार्यक्षेत्रात नाहीत. प्रयत्न करूनही त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. या पार्श्र्वभूमीवर निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत इंगोले यांनी निवडणूक आयोगाच्या निरीक्षक डॉ.माधवी खोडे यांची शनिवारी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. वंचितच्या मतांची संख्या दोन आकडीसुद्धा नाही; पण या पक्षाचा उमेदवार निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्याचा आग्रह धरत असताना नगरसेवकांच्या अनुपलब्धतेबद्दल काँग्रेस पक्षाने मात्र आतापर्यंत मौन बाळगले आहे. हा फरकही यानिमित्ताने ठळक झाला.