विशेष प्रतिनिधी
नांदेड ः विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची येथे धामधूम सुरू असताना काँग्रेस पक्षातील आर्थिक गैरव्यवहार आणि स्थानिक पातळीवर झालेल्या उधळपट्टीबद्दल पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.
काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष अब्दुल अजिज कुरेशी यांनी वरील विषयी तक्रार केल्यानंतर प्रदेशाध्यक्षांचे निकटवर्ती व उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी तक्रारीची गंभीर नोंद घेतली असल्याचे सांगण्यात आले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने इच्छुकांकडून शुल्क जमा केले होते. त्यांतील प्रदेश कार्यालयाकडे पाठवावयाची रक्कम स्थानिक पातळीवर खर्च करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तसेच पक्षाच्या तत्कालीन जिल्हाध्यक्षांनी काँग्रेस पक्ष सोडताना पक्षाच्या बँक खात्यात असलेली मोठी रक्कम इतरांच्या खात्यात वळवली. नंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी एका राष्ट्रीयकृत बँकेमध्ये नवे खाते उघडले.
या खात्यातून रक्कम काढण्यासाठी तीन जिल्हाध्यक्षांपैकी एक आणि कोषाध्यक्ष यांची स्वाक्षरी अनिवार्य ठेवण्यात आली. गेल्या जानेवारी महिन्यात पक्षाच्या या बँक खात्यात जवळपास 15 लाख जमा होते; पण गेल्या दीड महिन्यांत या खात्यातून मोठी रक्कम खर्च करण्यात आली, असे अब्दुल अजिज कुरेशी यांचे म्हणणे आहे.
कुरेशी यांनी तर स्थानिक कारभाऱ्यांवर अफरातफरीचा आरोप ठेवत संपूर्ण चौकशी करा, अशी मागणी केली असल्याचे दिसून येते. पक्षाने आता पूर्वीचे जिल्हाध्यक्ष बदलले आहेत. त्यांनी आर्थिक बाबींमध्ये अद्याप लक्ष घातलेले नाही. तर कोषाध्यक्ष मुन्ना अब्बास यांच्याशी प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही. पक्षातील आर्थिक बाबींसंबंधी उपाध्यक्ष गणेश पाटील यांच्याशी बोलणे झाले असल्याचे तक्रारकर्ते कुरेशी यांनी सांगितले.
नांदेड-वाघाळा मनपाच्या निवडणूक काळात स्थानिक काँग्रेस पक्षाकडे वरून मोठा निधी आला होता. त्या निधीतील रक्कम पक्षाच्या उमेदवारांना वाटप करताना मोठा घोळ झाला होता. अनेक उमेदवारांना पक्षाकडून रक्कम मिळालीच नाही. काही उमेदवारांना जास्त रक्कम दिल्या गेली; पण निवडणुकीनंतर त्याबद्दल कोणीही तक्रार केली नाही. आता कुरेशी यांनी पक्षाच्या बँक खात्याचा संदर्भ देत संघटन सृजन अभियानात उधळपट्टी केल्याचा आरोप केल्यामुळे संबंधितांत खळबळ उडाली आहे.
शहानिशा करावी लागेल - अब्दुल अजीज कुरेशी यांनी केलेल्या तक्रारीबाबत सध्या तरी काहीच प्रतिक्रिया देता येणार नाही. या तक्रारीची मला कल्पना नाही, याबाबत शहानिशा करावी लागेल.गणेश पाटील, प्रदेश उपाध्यक्ष, काँग्रेस