

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत शरद पवार राष्ट्रवादीने आपल्या मागणीचा विचार होत नसल्याने शेवटचा अल्टिमेटम देत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
शरद पवार राष्ट्रवादीने 14 जागांसाठी आग्रह धरला आहे. मात्र तेवढ्या जागा देण्यात काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी असमर्थता व्यक्त केल्यानंतर शरद पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार असे वाटत असतानाच मंगळवारी काँग्रेस व शिवसेनेने आघाडी होणार असे जाहीर केले. सतेज पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर शिवसेनेने ही आघाडी केल्याचे जाहीर केले. ठाकरे शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी सतेज पाटील यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत आघाडीची घोषणा करण्यात आली तरी त्यामध्ये शरद पवार राष्ट्रवादीचा समावेश नाही. ठाकरे शिवसेनेला 12 जागा देण्यात येणार आहेत. त्यापैकी 7 जागांवर एकमत झाले असून 5 जागांवर चर्चा सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले; तर दुधवडकर यांनी 16 जागांची मागणी केल्याचे स्पष्ट केले होते.
दरम्यान, व्ही. बी. पाटील यांनी आमच्या पक्षाला केवळ दोन-चार जागा देण्यात येणार असल्याच्या बातम्या आपण वृत्तपत्रात वाचल्या होत्या. त्याबाबत आपण पक्षातील वरिष्ठांना ही गोष्ट सांगितली. त्यानंतर पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सतेज पाटील यांच्याशी चर्चा केली. जयंत पाटील यांनी आपल्याला माझे बोलणे झाले आहे, तुम्ही सतेज पाटील यांना भेटून घ्या, असा निरोप दिला. त्यानुसार आपण व रोहित पाटील यांनी सतेज पाटील यांना भेटून 14 जागांची मागणी असून तेवढ्या जागा आमच्या पक्षाला दिल्या तर आपण समाधानी असल्याचा शेवटचा अल्टिमेटम त्यांना दिल्याचे सांगितले. आपल्या मागणीनुसार 14 जागा देण्यास सतेज पाटील यांनी असमर्थता दाखविली.
एवढेच नव्हे तर आर. के. पोवार यांच्यासारख्या गेली 50 वर्षे सार्वजनिक जीवनात वावरणार्या कार्यकर्त्याबाबत जी भूमिका घेतली ती बरोबर नव्हती. त्यांचे कामात सातत्य आहे. तरीही पोवार यांच्याबाबत विचारही होऊ नये तसेच काही अडचण असेल तर त्यांना बोलावून विश्वासात घेऊन पटवून सांगणे हे शक्य होते. मात्र यापैकी काहीही न करता तिथे थेट बाहेरच्या उमेदवाराला आणून उमेदवारी देणे यामुळे आमच्या पक्षात याबाबत नाराजी असल्याचेही व्ही. बी. पाटील म्हणाले. यापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीवेळीही सतेज पाटील व व्ही. बी. पाटील यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले होते. व्ही. बी. पाटील यांनी सतेज पाटील विश्वासात घेत नसल्याचा आरोप केला होता.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अडचण नाही
महानगरपालिकेच्या निवडणुकीत जागा वाटपामध्ये सन्मानाने स्थान मिळत नसेल तर महाविकास आघाडीत राहण्यापेक्षा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर आम्हाला काहीच अडचण नाही. दोन्ही राष्ट्रवादीसाठी आम्ही सकारात्मक आहोत. पुण्यात झाले ते कोल्हापुरात होण्यास काय हरकत आहे. काका पुतणे आहेत चिंता करण्याचे कारण नाही आम्ही सोबत जायला तयार आहोत. असे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी सांगितले.
तर आमची ताकद दाखवू
महाविकास आघाडीमध्ये लोकशाहीला फरफटत नेण्याचा उद्योग सुरू आहे. शरद पवारांची ताकद मत्यांनाफ माहित आहे. काँग्रेस मोठा भाउ असल्याचे आम्ही मान्यच करतो. मात्र मोठा भाउ लहानभावास दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही आम्ही आमची ताकद दाखविण्यासाठी निवडणूक लढवू आणि जिंकुनही दाखवू, असे कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांनी सांगितले.
अन्यथा तिसरी आघाडी करणार : व्ही. बी. पाटील
जागावाटपाबाबत आम्ही दिलेल्या प्रस्तावावर आम्ही ठाम राहिलो नाही. एक पाऊल मागे घेतले आहे. तरी देखील काँग्रेस ताठर भूमिका घेणार असेल तर समविचारी पक्षांना सोबत घेऊन तिसरी आघाडी करण्यात येईल, असेही व्ही. बी. पाटील यांनी सांगितले. यासंदर्भात आमदार सतेज पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.