Aadhaar card file photo
नांदेड

Aadhaar card : आधारकार्डसाठी विद्यार्थ्याकडून पैशाची वसुली

सेतू केंद्रावर कारवाई करण्याची मागणी; विद्यार्थ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

पुढारी वृत्तसेवा

Collection of money from a student for an Aadhaar card

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : आधारकार्ड काढून देण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून तीन हजार ५०० रुपये घेतल्याचा गंभीर आरोप भोकर येथील एका सेतू सुविधा केंद्रावर करण्यात आला आहे. सर्व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असूनही आणि अनेक वेळा सेतू सुविधा केंद्रापासून तहसील कार्यालयापर्यंत पाठपुरावा करूनही आधारकार्ड मिळाले नसल्याने महसूल प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नांदा (ता. भोकर) येथील विद्यार्थी माधव बालाजी वाघमारे यास आधार कार्ड मिळत नसल्याने शेवटी त्याने थेट जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून संबंधित सेतू केंद्रावर कारवाई करून आधार कार्ड मिळवून देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आता सेतू केंद्राच्या कारभाराविषयी अॅक्शन मोडवर येणार का? हे पाहावे लागणार आहे.

विद्यार्थ्याच्या तक्रारीनुसार, संबंधित सेतू सुविधा केंद्राने आधारकार्ड काढून देण्यासाठी तीन हजार ५०० रुपये घेतले. मात्र, पैसे स्वीकारल्यानंतरही विद्यार्थ्याचे काम पूर्ण झाले नाही. पुढे याबाबत तहसील कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

यानंतर संबंधित सेतू केंद्राने विद्यार्थ्याला नांदेड येथे जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार नांदेड येथील एका सेतू सुविधा केंद्रात आणखी एक हजार रुपये खर्च करूनही आधारकार्डाची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, विद्यार्थ्याकडे शाळा सोडल्याचा दाखला, जन्म प्रमाणपत्र तसेच आई-वडिलांचे आधारकार्ड अशी सर्व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध आहेत. तरीही आधारकार्ड मिळत नसल्याने नागरिकांना मूलभूत सेवांसाठी किती हेलपाटे मारावे लागत आहेत, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सेतू सुविधा केंद्रावर योग्य ती कारवाई करावी तसेच प्रलंबित आधारकार्ड तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी माधव वाघमारे यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, भोकर तहसील कार्यालयाच्या कार्यपद्धतीबाबतही वारंवार तक्रारी समोर येत असल्याने जिल्हा प्रशासनाने येथील कारभाराची गंभीर दखल घेण्याची मागणी आता यानिमित्ताने केली जात आहे.

जिल्हाधिकारी कारवाई करणार का ?

आधारकार्डाच्या नावाखाली विद्यार्थ्याकडून ३,५०० रुपये घेतल्याचा आरोप संबंधित सेतू सुविधा केंद्रावर करण्यात आला आहे. त्यानंतरही काम न झाल्याने विद्यार्थ्याला नांदेडपर्यंत जाऊन अतिरिक्त खर्च करावा लागल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून आरोप सिद्ध झाल्यास संबंधित सेतू सुविधा केंद्राचा परवाना रद्द करण्यासह अन्य प्रशासकीय कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT