Chikhlikar's daughter's importance in BJP has decreased!
विशेष प्रतिनिधी
नांदेड : प्रताप पाटील चिखलीकर यांच्या खासदारकीच्या काळात त्यांच्या कन्या प्रणिता देवरे-चिखलीकर यांचे भाजपामध्ये वाढलेले महत्त्व या पक्षातील 'अशोक पर्वा'त घटले असून महत्त्वाच्या बैठका आणि कार्यक्रमांपासून त्यांना दूर ठेवण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या भाजपाच्या बैठकीला नांदेडच्या तीन संघटनात्मक जिल्ह्यांतून प्रत्येकी १५ अशा ४५ जणांना आमंत्रित करण्यात आले होते. त्या सर्वांची नावे जाहीर झाली नाहीत; पण भाजपात सक्रिय असलेल्या महिला कार्यकर्त्यांतून केवळ ज्योती किशन कल्याणकर यांचा समावेश होता. त्या नांदेड महानगर भाजपात महिला आघाडीच्या प्रमुख आहेत.
जि.प.च्या माजी अध्यक्ष मंगार ाणी अंबुलगेकर ह्या भाजपा उत्तर जिल्ह्याच्या सरचिटणीस आहेत. त्या खा. अशोक चव्हाण समर्थक असूनही त्यांना किंवा जिल्हा बँकेच्या संचालक सविता रामचंद्र मुसळे यांना तसेच द. जिल्ह्यातून कोणत्याही महिलेला यादीमध्ये स्थान मिळाले नाही.
निमंत्रण देण्या न देण्याच्या मुद्यावरुन पक्षामध्ये कुरबूर झाली नसली, तरी प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कन्येची भाजपामध्ये उपेक्षा केली जात असल्याचे दिसत आहे. गतवर्षी मुख्यमंत्र्यांच्या संमतीने चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला; नंतर ते या पक्षातर्फे विधानसभेवर निवडूनही आले. तत्-पूर्वी त्यांनी आपल्या मुलाला भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात भरती केले; पण कन्येला भाजपातच कार्यरत ठेवले.
प्रणिता यांना भाजपात राहू द्या, अशी सूचना देवेन्द्र फडणवीस यांनी दिली होती, असे सांगितले जाते, पण चिखलीकर यांनी मागील काही महिन्यांत आपल्या आधीच्या पक्षात फूट पाडून 'राष्ट्रवादी'चा विस्तार केला. इतर पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांनाही चिखलीकर यांनी 'राष्ट्रवादी'त आणले. पण त्यांनी आपली मुलगी ज्या पक्षात आहे, त्या पक्षालाही खिंडार पाडल्याच्या मुद्यावर भाजपात त्यांच्याबद्दल नार- ाजी असून या पार्श्वभूमीवर जि.प.निवडणुकीत त्यांच्या कन्येला उमेदवारी देण्यास भाजपातील खासदार व दोन आमदार विरोध करू शकतात, असे सांगितले जात आहे.
गेल्या काही महिन्यात भाजपा दक्षिण जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी प्रणिता यांना अघोषितपणे बहिष्कृत केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मागील नांदेड दौऱ्यातही प्रणिता यांना व्यासपीठ तसेच अन्य कोठेही स्थान नव्हते. पक्षातील त्यांच्या एकंदर अस्तित्वाची देवेन्द्र फडणवीस किंवा भाजपा प्रदेशाध्यक्षांनी अलीकडच्या काळात कोणतीही नोंद घेतलेली नाही.