Chikhalikar has been excluded from the NCP's list of star campaigners
विशेष प्रतिनिधी
नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्याच्या नांदेडचा विकासनामा सादर करत, नांदेडचा कारभारी बदलण्याचे आवाहन करणाऱ्या आ.प्रताप पाटील चिखलीकरांना मतदारांनी सपशेल नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून चिखलीकर यांना वगळले आहे.
भाजपा नेते खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाला आव्हान देत आ. चिखलीकर नांदेड-वाघाळा मनपा निवडणुकीत उतरले होते. त्यांनी पक्षातर्फे ५४ उमेदवार रिंगणात उतरविले; पण त्यांतील केवळ दोघे निवडून आले, तर ५२ जणांचा दारुण पराभव झाला. निवडणुकीतील या सपशेल आपटीनंतर चिखलीकर माध्यमांसमोर आलेच नाहीत, पक्षाच्या या अपयशाचे खापर त्यांच्यावर फोडले जात आहे.
मनपा निवडणुकांपूर्वी राज्यात नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या. या दोन्ही निवडणुकांकरिता राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये आ. चिखलीकर यांचा समावेश होता, असे असले, तरी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बाहेरच्या जिल्ह्यात ते कोठेही गेले नाहीत किवा त्यांना कोणी पाचारणही केले नाही.
मनपा निवडणुका शेवटच्या टप्प्यात आल्या असतानाच राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा केली, नांदेड उराणि लातूर जि.प.ची निवडणूक त्वात होणार नसली, तरी मराठवाडयात ४ जिल्हा परिषदांची निवडणूक पुढील महिन्यात होणार आहे. त्याकरिता 'राष्ट्रवादी'ने आपल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर आहे.
त्यातून चिखलीकरांचे नाव गळाले आहे. नांदेड जिल्ह्यातील या पक्षाच्या कोणत्याही नेत्याचा स्टार प्रचारकांत समावेश नाही, असे दिसून आले. राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये पक्षाध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ, खा. प्रफुल्ल पटेल, आ. दिलीप वळसे पाटील, पक्षाचे बहुसंख्य मंत्री, मुश्ताक अंतुले, आ.श्रीमती सना मलिक, रूपाली चाकणकर, नजालभाई मलिक आदी ४० नेत्यांचा समावेश आहे.
मराठवाड्यातील स्टार प्रचारक
मराठवाडयातून सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे व संजय बनसोडे, परभणीचे आमदार राजेश विटेकर, विधान परिषदेतील सदस्य सतीश चव्हाण आणि विक्रम काळे या सहा जणांना राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये स्थान देण्यात आले आहे.