नायगाव : आनंदीबाई शिक्षण प्रसारक मंडळ, होटाळा (ता. नायगाव, जि. नांदेड) या संस्थेवर वर्षानुवर्षे बेकायदेशीर व दादागिरीच्या कारभाराने कब्जा करणाऱ्या स्वयंघोषित कार्यकारी मंडळाला व स्वतःला मुख्याध्यापिका म्हणून मिरवणाऱ्या ताराबाई सुभाषराव कदम यांना धर्मादाय उपायुक्त न्यायालय, नांदेड यांनी 3 डिसेंबर 2025 रोजी दिलेल्या आदेशाने जोरदार झटका दिला आहे.
1997 पासून नोंदणीकृत असलेल्या या संस्थेच्या नावावर काही विशिष्ट व्यक्तींनी खोटे, बनावट व फेरफार केलेले अभिलेख तयार करून स्वतःची नावे कार्यकारी मंडळात दाखवली. या बेकायदेशीर मंडळाच्या आडून संस्थेंतर्गत चालणाऱ्या शाळांमध्ये अनधिकृत शिक्षक भरती दाखवून शासनाची लाखो रुपयांची पगाराच्या माध्यमातून फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी शिक्षणाधिकारी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून माननीय उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाने संबंधित शिक्षकांच्या नेमणुका यापूर्वीच रद्द केल्या असून, ताराबाई कदम यांच्याविरुद्ध रिकव्हरीची कार्यवाही सुरू आहे. तरीही स्वतःला संस्थाचालक असल्याचा बनाव करून ताराबाई कदम व त्यांच्या साथीदारांनी धर्मादाय उपायुक्त न्यायालयात फेरफार अर्ज दाखल केले होते.
मात्र, धर्मादाय उपायुक्त न्यायालयाने हे सर्व फेरफार अर्ज स्पष्टपणे फेटाळून लावत संस्थेच्या कायदेशीर व नियमित कार्यकारी मंडळाला मान्यता दिली आहे. त्यामुळे संस्थेवर दादागिरी करणाऱ्या व बेकायदेशीर कारभार करणाऱ्या व्यक्तींना न्यायालयाने कायमस्वरूपी दणका दिला आहे. या कार्यकारी मंडळाच्या कार्यकाळावर न्यायालयाने अधिकृत शिक्कामोर्तब केले असून, हा कार्यकाळ 16 जून 2024 ते 15 जून 2029 असा आहे.
संस्थेच्या वतीने हा न्यायालयीन लढा ॲड. मुकुंद चौधरी यांनी प्रभावीपणे लढवला, तर संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीसाठी आवश्यक निर्देश ॲड. निखिल चौधरी यांनी धर्मादाय सहायुक्त, नांदेड यांच्याकडून मिळवून दिले. या निर्णयामुळे शिक्षण संस्थांतील बेकायदेशीर हस्तक्षेप, बनावट अभिलेख आणि शासन फसवणुकीविरोधात न्यायालयाचा कठोर संदेश गेल्याची चर्चा शिक्षण व सामाजिक वर्तुळात होत आहे.
मान्यताप्राप्त कार्यकारी मंडळ
अध्यक्ष : भगवान पवार
उपाध्यक्ष: सुधीर पवार
सचिव: किशन जाधव
सहसचिव : जयश्री पवार
कोषाध्यक्ष : शंकर शिंदे
सदस्य : प्रल्हाद हंबर्डे
सदस्य : दत्ताराम गायकवाड