Biloli Illegal Cattle Bones factory
बिलोली : राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा पूर्णपणे लागू असतानाही बिलोली शहरालगत कोंडलापूर रस्त्यावर असलेल्या हाडाच्या कारखान्यांमध्ये लाखो गोवंश जनावरांच्या हाडांचा साठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे शहरातील कुरेशी समाजाने आक्रमक भूमिका घेत कारखाना चालकावर गोवंश हत्या बंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
राज्यातील गोवंश हत्या बंदी कायद्यानुसार बिलोली शहर व तालुक्यात गोवंश हत्येवर पूर्णतः बंदी आहे. यामुळे अनेक कुरेशी समाजातील नागरिकांवर गुन्हे दाखल झाले असून, त्यांनी गोवंश कत्तलीचे व्यवसाय थांबवले आहेत. काही व्यापाऱ्यांनी लपूनछपून व्यवसाय केल्यास पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्यामुळे कत्तलखान्यांमध्ये सध्या शुकशुकाट आहे.
मात्र, कोंडलापूर रस्त्यावरील हाडाच्या कारखान्यांमध्ये लाखो गोवंशाच्या हाडांचा साठा असल्याचा धक्कादायक प्रकार कुरेशी समाजातील युवकांनी उघडकीस आणला आहे. त्यामुळे "गोवंश हत्या बंदी कायदा असताना या कारखान्यात लाखो गोवंशाची हाडे आली कुठून?" असा सवाल उपस्थित होत आहे. कुरेशी समाजाने या हाडांचे साठे तात्काळ जप्त करून कारखाना चालकावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा असतानाही बिलोली शहरालगत चार अनधिकृत हाडाचे कारखाने सुरू आहेत. या कारखान्यांना कोणाचा आशीर्वाद आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लाखो गोवंशाच्या हाडांचा साठा असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मात्र, पोलीस व महसूल प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची कुरेशी समाजाची तक्रार आहे.- जावेद कुरेशी, माजी नगरसेवक, न. प. बिलोली