Nanded Crime News pudhari photo
नांदेड

Nanded Crime : पोलिसांच्या अंगावर कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

सिनेस्टाईल पाठलाग करून तीन आरोपींना पकडले, गुन्ह्यातील आलिशान कारही जप्त

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : शहरात नाकाबंदी दरम्यान पोलिसांशी हुज्जत घालून, थेट पोलिसांच्याच अंगावर भरधाव कार घालून त्यांना जीवे मारण्याचा थरारक प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना राजकॉर्नर भागात घडली आहे. या हल्ल्यात एक सहायक पोलिस निरीक्षक जखमी झाले असून, आरोपींनी आय.टी.आय चौकातील बॅरिकेड्सही तोडून नुकसान केले. याप्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी अत्यंत सतर्कता दाखवत पाठलाग करून ३ आरोपींना अटक केली आहे, तर एक आरोपी फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राजकॉर्नर भागात रात्री ११ ते पहाटे ३ दरम्यान नाकाबंदी लावण्यात आली होती. रात्री पावणेबाराच्या सुमारास एका काळ्या रंगाच्या हॅरिअर कारला पोलिसांनी तपासणीसाठी थांबवले. याचा राग आल्याने कारमधील संशयितांनी भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष तांबे आणि कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली.

वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने थेट पोलिसांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. यात मुखेड पोलिस ठाण्याचे सपोनी जावेद शेख हे जखमी झाले. यानंतर आरोपींनी पळ काढताना आय.टी.आय चौकातील शासकीय बॅरिकेड्स तोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक संतोष तांबे, पोउपनि विनोद देशमुख, नरेश वाडेवाले आणि क्यू.आर.टी. पथकाने आरोपींचा थरारक पाठलाग केला. पोलिसांनी गुरुद्वारा परिसरातून कारसह तीन आरोपींना बेड्या ठोकल्या.

  • ​तरणजितसिंघ अमरिपसिंघ बल (१९), अमरिंदसिंघ कुलप्रतापसिंघ कपुर (१९, दोन्ही रा. भगतसिंघ रोड) आणि हर्षदिपसिंघ नरेंद्रसिंघ सुखई (१९, रा. अबचलनगर, नांदेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, तर परविंदरसिंघ ऊर्फ अंगद नेहंग हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली २५ लाख रुपये किमतीची हॅरिअर कार (MH-26 CV-9898) जप्त केली असून, आरोपींवर शासकीय कामात अडथळा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT