Cancel 'Swarati' Marathwada University's Jnantirtha Youth Festival
विशेष प्रतिनिधी
नांदेड : नांदेडसह स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील अन्य तीन जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना उभारी देण्याचे काम वेगवेगळ्या माध्यमांतून होत असताना प्रस्तुत विद्यापीठाने यंदाचा युवक महोत्सव रद्द करावा अशी मागणी अनेक जबाबदार व्यक्ती आणि संघटनांकडून करण्यात आल्यानंतरही विद्यापीठामध्ये युवक महोत्सवाचा डंका पिटला जात आहे.
वरील विद्यापीठाचा 'ज्ञानतीर्थ-२०२५' युवक महोत्सव आधी येत्या ९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान नांदेडच्या विष्णुपुरी परिसरातील ग्रामीण तंत्रनिकेतन व व्यवस्थापन महाविद्यालयाच्या परिसरात घेण्याचे निश्चित झाले होते; परंतु या महोत्सवाची तारीख बदलून १२ ते १५ ऑक्टोबर या दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. तारीख लांबवताना अतिवृष्टीचेच कारण देण्यात आले होते.
विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ४० तालुक्यांपैकी २१ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे प्रचंड नुकसान झाले असून तेथील जनजीवन पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे. अशा दारुण परिस्थितीत सण-उत्सव साजरे करणे योग्य नसल्याचे नमूद करून राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रशांत पेशकार यांनी युवक महोत्सवाचा फेरविचार करण्याची मागणी कुलगुरूंकडे केली तर विद्यापीठ विकास मंचचे अॅड. केदार जाधव यांनीही वरील मुद्यावरुनच युवक महोत्सव रद्द करण्याची मागणी केली.
बसव ब्रिगेडच्या डॉ. व्यंकट पाटील कुन्हाडे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी युवक महोत्सव रद्द करून या महोत्सवावर केला जाणारा लाखो रूपयांचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याची मागणी कुलगुरूंकडे आधीच केली होती. त्यानंतर विद्यापीठात पी.एचडी. करणारे संदीपकुमार देशमुख बारडकर यांनीही कुलगुरूंना सविस्तर निवेदन पाठवून युवक महोत्सव रद्द करण्याची मागणी केली.
विविध संघटना आणि व्यक्तींकडून याच स्वरुपाच्या मागण्या सुरू झाल्या असताना विद्यापीठात मात्र विद्यार्थी विकास विभागाच्या माध्यमातून युवक महोत्सवाची तयारी सुरू झाली असल्याचे दिसून आले. विद्यार्थी विकास विभागाच्या संचालक पदाच्या नियुक्तीतील जातीयवादी राजकारण यानिमित्ताने उघड झाले. विद्यापीठातील एका प्राध्यापकाच्या माध्यमातून युवक महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आ-लेली असताना त्यांना तेथून हटवून देगलूर येथील एका प्राध्यापकाकडे हा विभाग सोपविण्यात आल्यानंतर त्यावरही तक्रारी सुरू झाल्या आहेत; पण विद्यापीठ प्रशासनाने युवक महोत्सव रद्द करण्याच्या मागणीवर अद्याप कोणताही विचार केलेला नाही, असे दिसून आले.
अतिवृष्टीमुळे नांदेडसह सर्वच भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव घ्यावा की घेऊ नये, यासंदर्भातील निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीने घ्यावा. ही समिती जो निर्णय घेईल तो मलाही मान्य राहील. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या दुःखात आम्हीही सहभागी आहोत.डॉ. मनोहर चासकर, कुलगुरू