Crime News : घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ४ जण अटकेत, सव्वा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त file photo
नांदेड

Crime News : घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ४ जण अटकेत, सव्वा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

दिवाळी सणाच्या सुट्टयांमध्ये नागरिक बाहेरगावी गेलेल्या संधीचा फायदा घेऊन बंद घरे फोडणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्यांच्या टोळीला भाग्यनगर पोलिसांनी गजाआड केले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Burglary gang busted; 4 arrested, stolen property worth over 8.25 lakh rupees seized

नांदेड, पुढारी वृत्तसेवा: दिवाळी सणाच्या सुट्टयांमध्ये नागरिक बाहेरगावी गेलेल्या संधीचा फायदा घेऊन बंद घरे फोडणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्यांच्या टोळीला भाग्यनगर पोलिसांनी गजाआड केले आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल ८ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे नांदेड शहरातील ३ गंभीर घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

दिवाळीनिमित्त नागरिक मूळ गावी वा बाहेरगावी गेल्यामुळे भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सह्याद्रीनगर, कार्तिक नगर (तरोडा बु.) आणि वर्धमान नगर (मालेगाव रोड) या परिसरातील बंद घरांचे कुलूप व कडी-कोंडे तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, लॅपटॉप, रोख रक्कम व इतर मौल्यवान साहित्य लांबवले होते.

याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष तांबे आणि गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या आधारे तपास चक्रे वेगाने फिरवली.

पोलिसांनी तेजय दत्तात्रय सूर्यवंशी (२५, रा. मगनपुरा), स्वप्नील लक्ष्मण मुंडलोड (२४, रा. कृष्ण हाईट्स अपार्टमेंट), गोविंद मनोज खंडागळे (१८, रा. सम्राट अशोक नगर) आणि अक्षय रमेश इंगोले (२१, रा. जयभीम नगर, सर्व रा. नांदेड) या चार आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, २ लॅपटॉप, मोबाईल, विविध इलेक्ट्रॉनिक साहित्य तसेच गुन्ह्यात वापरलेल्या व चोरीच्या २ दुचाकी असा एकूण ८,२५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी इतरत्रही गुन्हे केले आहेत का, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT