धर्माबाद: घर नावे करून देण्याच्या कारणावरून सख्ख्या भावाचाच खून झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना शंकरगंज परिसरात शनिवारी (दि.8) मध्यरात्री घडली. कौटुंबिक वादाचे रूपांतर रक्तरंजित हत्येत झाल्यानंतर शंकरगंजमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अरुण शंकरराव पाटील (वय ३०) याचा आपल्या सख्ख्या भावासोबत मयत आशिष शंकरराव पाटील (वय २८) याच्याशी घर आपल्या नावे करून देण्यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद चालू होते. वाद चिघळत जाऊन शनिवारी (ता. ८) मध्यरात्री दोन ते तीनच्या सुमारास अरुणने आशिषवर जुन्या लाकडी चौकटीने डोक्यावर, तोंडावर, पायावर व शरीरावर वार करत त्याचा जागीच खून केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. आरोपीनं आपला सख्खा भावाला अशा निर्दयी पद्धतीने ठार मारल्याची माहिती समोर आल्यानंतर नागरिक अवाक झाले आहेत.
या प्रकरणी सावत्र भाऊ निलेश शंकरराव पाटील (वय ३८) यांच्या फिर्यादीवरून धर्माबाद पोलिसांत गु.र.न. 311/2025, कलम 103(1) बीएनएस अंतर्गत हत्या गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक लता पगलवाड पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. कौटुंबिक वादातून उफाळून आलेल्या या हत्येमुळे शंकरगंजमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.