मुखेड : मुखेड तालुका डोंगराळ व प्रमुख शेती व्यवसाय डबघाईस आल्याने रोजगारासाठी मजुरांचे स्थलांतर होत आहे. हे स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. त्यामुळे तालुक्यात औद्योगिकीकरणासह दळणवळणाची सुविधा आवश्यक आहे. त्यासाठी निजामकाळापासून प्रस्तावित असलेला बोधन, मुखेड, लातूर रेल्वेमार्ग कार्यान्वीत होणे गरजेचे आहे. स्थानिक पातळीवरील राजकीय इच्छा शक्तीचे पाठबळ मिळाल्यास हा रेल्वेमार्ग सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
केंद्रात व राज्यात भाजपाची स-त्ता असल्यामुळे निजामकाळापासून प्रस्तावित मागणीबाबत पाठपुरावा करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचे पाठबळ मिळाल्यास हा रेल्वे प्रश्न मागीॅ लागण्याची शक्यता आहे. भाजपचे खा. अशोकराव चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछडे हे प्रमुख नेते आहेत. बोधन, मुखेड, लातूर रेल्वेमार्ग हा रेल्वे मार्ग ज्या भागातून जातो, त्यात आ. डॉ.तुषार राठोड, आ. राजेश पवार, आ. दिनेश अंतापुरकर यांचेही मुख्यमंत्र्यांसोबत चांगले संबंध आहेत. या रेल्वेमार्गासाठी या संबंधांचा उपयोग करून घेता येणार आहे.
मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रेल्वेमार्गासाठी पाठपुरावा करू व या साठी शासन आपला 50% निधी देण्यास तयार असल्याचे जाहीर सभेत सांगितले हेोते. त्यासाठी पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे.
तत्कालीन केंद्रिय मंत्री शंकरराव चव्हाण यांच्या पाठपुराव्या मुळे 1982-83 ला तत्कालीन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री विजय नवल पाटील यानी ह्या मार्गाच्या सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. तद्नंतर सुरेश कलमाडी, सुरेश प्रभू व रावसाहेब दानवे यांच्या काळात या मार्गाचे सर्वेक्षण झाले. हा अहवाल निती आयोगाकडे पाठवण्यात आल्याची माहिती आहे.
लातूर येथील रेल्वे बोर्डाचे माजी सदस्य मोतीलाल डोईजोडे हे या प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. हा मार्ग व्हावा या साठीचे त्यांचे प्रामाणिक प्रयत्न पाहता या भागातील स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेतल्यास भविष्यात हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी स्थानिक व्यावसायिक दिलीप कोडगीरे हे देखील सक्रिय आहेत.
बिलोली, मुखेड, नायगावला लाभ
हा प्रकल्प झाल्यास मुंबई ते विशाखापट्टणम थेट व्यापारालाही चालना मिळू शकेल. जळकोट, मुखेड, नायगाव व बिलोलीच्या विकास पर्वाला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल.