Boats and rafts worth Rs 60 lakhs blown up Revenue-police alliance action
नांदेड, पुढारी वृत्तसेवा पर्यावरणाच्या संरक्षणासाठी महसूल व पोलिसांनी युती केली असून संयुक्त कारवाईत अनधिकृत वाळू उपसा करण्यासाठीची तब्बल ६० लक्ष रुपयांची साधने जिलेटीनच्या स्फोटात नष्ट करण्यात आली. गुरुवारी (दि.६) सूर्योदयाच्या साक्षीने वासरी, शंखतीर्थ (ता. मुदखेड) येथे ही कारवाई करण्यात आली.
मुदखेड तालुका हा हरितपट्टा म्हणून घोषित आहे. तरी देखील वाळूमाफियांनी येथील प्रत्येक घाटावर उच्छाद मांडला आहे. याबाबत पुढारीने सातत्याने पाठपुरावा केला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात वाळूचा अवैध उपसा व वाहतूक याबाबत बारकाईने लक्ष ठेवून धडक कारवाया केल्या आहेत. वाळूचा अवैध उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारे बोटी, तराफे व अन्य साहित्य जागेवरच जाळून टाकणे, जिलेटीनच्या स्फोटात नदीच्या पात्रातच नष्ट करणे आदी कारवाया केल्या.
मुदखेड तालुक्यात मात्र वाळूमाफिया मोकाट सुटले होते. याबाबत नुकतेच पुढारीने सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर महसूल व पोलीस विभाग यांनी संयुक्त कारवाई करण्याचा निश्चय करुन गुरुवारी (दि. ६) सकाळी ५ वाजेच्या सुमारास वासरी व शंखतीर्थ येथील घाटावर गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकली. यावेळी प्रत्येकी सात लक्ष रुपयांच्या पाच छोट्या बोटी, तीन तराफे व एक वाळू उपसा करणारे इंजिन व अन्य साहित्य असे मिळून ६० लक्ष रुपयांचे साहित्य जिलेटीनचा स्फोट करुन उडवून जागीच नष्ट करण्यात आले.
वरील कारवाई पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार व अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुरज गुरव, अर्चना पाटील उपविभागीय अधिकारी डॅनिअल बेन तहसीलदार आनंद देऊनळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुदखेडचे पोलिस निरीक्षक धीरज चव्हाण, नायब तहसीलदार श्री. जगदार व कर्मचारी, पोलिस जमादार कवठेकर, कदम, वानोळे, कारामुंगे, शिंगारपुतळे आदींनी केली.
फायबर बोटी पाण्यात बुडवल्या
मुदखेडच्या महसूल प्रशासनाची कारवाई होऊ शकते या शक्यतेने शंखतीर्थ व वासरी येथील वाळू माफियांनी प्रत्येकी २ तर टाकळी येथे एक फायबर बोट पाण्यात बुडविली आहे. त्यामुळे त्यावर कारवाई होऊ शकली नाही. येत्या काळात गोदा पात्रात पुन्हा बोटी दिसल्यास कारवाई करू, असा इशाराच नायब तहसीलदार मारोती जगताप यांनी वाळमाफियांना दिला आहे.
मुदखेडच्या हरित पट्ट्यातील बेकायदेशीर वाळू उपसा आणि त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बोटींवर कारवाई होत नव्हती, असे दिसून आल्यानंतर 'दैनिक पुढारी'ने या बाबीकडे खुद्द जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर त्यांच्या आदेशावरूनच वरील कारवाई झाली असावी, असे सांगितले जात आहे. तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी भल्या पहाटेच मोठी कारवाई झाल्यामुळे वाळू माफियांची तंगडेतोड झाली आहे.