नांदेड ः महानगरपालिका स्वीकृत सदस्यपदासाठीच्या निवड प्रक्रियेत एकीकडे काँग्रेसचे कारनामे जगजाहीर होत असताना सत्ताधारी भाजपाने मात्र अद्यापही पत्ते गुलदस्त्यात ठेवले आहेत. भाजपने स्वीकृत केलेली पाच नावे कोणती, याबाबत उत्सुकता लागली असतानाच आता 10 इच्छुकांच्या स्वाक्षऱ्या घेवून बंद पाकिटात पाच नावे आयुक्तांकडे दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भाजपच्या नावांबाबत आणखी सस्पेन्स वाढला आहे.
16 मार्च रोजी होणाऱ्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्थायी, महिला व बालकल्याण आणि स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे. स्वीकृत सदस्यांची नांवे सादर करण्यासाठी गटनेत्यांना 13 मार्च रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यामुळे महापालिका परिसरात शुक्रवारी इच्छुकांसह विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. काँग्रेस, वंचित आणि एमआयएमच्या स्वीकृत सदस्यांची नांवे शुक्रवारीच उघड झाली. परंतु भाजपाचे एकही नाव अधिकृतरित्या बाहेर आले नव्हते.
भाजपचे गटनेते ॲड. महेश कनकदंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही कुठलाही प्रतिसाद दिला नाही. एवढेच नव्हे तर भाजपच्या चर्चेत असलेल्या उमेदवारांनाही गटनेत्याने अधिकृत नावांचा थांगपत्ता लागू दिला नाही.मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या 10 इच्छूक उमेदवारांकडून आवश्यक ती कागदपत्रे, प्रमाणपत्रे जमा करून त्यांच्या स्वाक्षऱ्याही घेण्यात आल्या होत्या.
या 10 पैकी 5 जणांची नांवे ऐनवेळी निश्चित करून ती आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात आली. स्वीकृतसाठी भाजपाने कोणत्या नावांना पसंती दिली, याचा उलगडा आता 16 रोजी सर्वसाधारणसभेतच होईल, असे दिसते. तोपर्यंत 10 इच्छुकांची मात्र धाकधुक वाढणार आहे.
16 पर्यंत गोंधळ
कुणाल कंदकुर्ते, आशुतोष जोशी, महेंद्र पिंपळे, डॉ.नरेश रायवार,मनोज लोहिया, सुप्रिया संजय पाटील,दिलीप ठाकूर, डॉ. शुभांगी देवसरकर, सुषमा थोरात आणि विश्वास कदम या दहा जणांच्या स्वाक्षऱ्या घेतल्याची माहिती आहे.यापैकी पाच जणांना स्वीकृत सदस्यपदाची लॉटरी निश्चित असली तररी 16 तारखेपर्यंत या सर्वांनाच गोंधळात रहावे लागणार आहे.