भाजपच्या पहिल्या महापौरपदाचा मानकरी कोण? pudhari photo
नांदेड

Nanded Municipal Politics : भाजपच्या पहिल्या महापौरपदाचा मानकरी कोण?

सलग 13 महापौर देणारी काँग्रेसची परंपरा होणार खंडित

पुढारी वृत्तसेवा

नांदेड ः नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणूक निकालानंतर सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाचा पहिला महापौर विराजमान होणार हे निश्चित झाले. गुरुवारी होणाऱ्या आरक्षण सोडतीनंतर महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित असणार हे निश्चित होईलच. यासोबतच नांदेडला सलग तेरा महापौर देणारी काँग्रेसची परंपराही खंडित होणार आहे.

नांदेड महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर 21 ऑक्टोबर 1997 रोजी नांदेडचे पहिले महापौर होण्याचा मान तत्कालीन शिवसेना नगरसेवक सुधाकर पांढरे यांना मिळाला. त्यानंतर 1998 मध्ये काँग्रेसच्या पहिल्या महापौर पदाची नोंद नगरसेविका मंगला निमकर यांच्या नावावर झाली. त्यानंतर नांदेड महानगरपालिकेवर काँग्रेसचेच महापौर विराजमान झाले.

1998 ते 2022 पर्यंत काँग्रेसने मागे वळून पाहिलेच नाही. गंगाधर मोरे, ओमप्रकाश पोकर्णा, अ. शमीम बेगम, बलवंतसिंघ गाडीवाले, प्रकाश मुथा, अजय बिसेन, अब्दुल सत्तार, शैलजा किशोर स्वामी, शीला किशोर भवरे, दीक्षा धबाले, मोहिनी येवनकर आणि जयश्री नीलेश पावडे असे सलग 13 महापौर विराजमान करण्याचा विक्रम काँग्रेसने नोंदविला. अर्थात ही किमया घडविण्यात माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांचाच सिंहाचा वाटा होता, हे सर्वश्रुत आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकी आधी अशोक चव्हाण यांनी भाजपा प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आणि काँग्रेसची विजयी परंपरा खंडित झाली. लोकसभेतील विजयानंतर काँग्रेसला विधानसभा व नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला.

महापालिकेत वर्षानुवर्षे सत्ता

गाजवलेल्या काँग्रेसला या निवडणुकीत मात्र अवघ्या दहा जागांवर समाधान मानावे लागले. खा. अशोक चव्हाण यांच्या चाणक्य नीती पुढे काँग्रेससह राष्ट्रवादी, शिवसेनेचा टिकाव लागला नाही. मनपा निवडणुकीमुळे तब्बल अडीच ते तीन वर्षांची प्रशासकीय राजवट संपल्यानंतर भाजपचा पहिला महापौर विराजमान होणार आहे. ही माळ आता कोणाच्या गळ्यात पडणार आणि महापौर पदाचा पहिला मानकरी कोण ठरणार? याची उत्सुकता लागली आहे.

एसटी, ओबीसी की ओपन?

महापौरपदाचे आरक्षण गुरुवारी नगर विकास राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सोडतीत निश्चित होणार आहे. नांदेडचे महापौर पद एस टी,ओबीसी की सर्वसाधारण प्रवर्गाला सुटणार याबाबत विविध तर्कवितर्क सुरू आहेत. आरक्षण कोणत्याही प्रवर्गाला सुटले तरी भाजपाकडे सर्वच प्रवर्गातील 45 नगरसेवक आहेत. या प्रवर्गातील इच्छुकांनी आपापल्या परीने विविध माध्यमातून वरिष्ठांकडे शिफारशी सुरु केल्या आहेत.

  • महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गाला सुटल्यास प्रभाग 10 मधून विजयी झालेले विरेंद्रसिंघ गाडीवाले यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. बीजी महाराज या टोपण नावाने सुपरचित असलेले गाडीवाले महापालिकेत1997 पासून तब्बल सहा वेळा निवडून आले.माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू, प्रामाणिक व निष्ठावंत शिलेदार म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. मनपात त्यांना आतापर्यंत कोणत्याही मोठ्या पदाची संधी प्राप्त झाली नाही. यावेळी मात्र त्यांना थेट महापौर पदाच्या खुर्चीवर बसण्याची संधी मिळेल अशी स्थिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT