संजीव कुळकर्णी
नांदेड ः भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेनंतर या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी यांच्या नांदेडमधील पहिल्या जाहीर सभेसाठी काँग्रेसच्या तत्कालीन नेत्यांनी येथील स्टेडियमचे मैदान मिळू दिले नव्हते; पण आता 40 वर्षांनंतर ‘काँग्रेसमय’ झालेल्या नांदेड भाजपातील स्थानिक नेत्यांनीच वाजपेयी यांचा पुतळा मनपाच्या माध्यमातून उभारण्यास अग्रक्रम दिला आहे.
सुमारे दोन महिन्यांपूर्वी पार पडलेल्या नांदेड-वाघाळा मनपा निवडणुकीत भाजपाने 81 पैकी 45 जागा जिंकून महानगर विकासाचे नियोजन-संचालन करणाऱ्या या संस्थेत प्रथमच एकहाती सत्ता प्राप्त केली. नांदेड शहर व जिल्ह्यात काँग्रेसचे नेतृत्व दीर्घकाळ केल्यानंतर दोन वर्षांपूर्वी भाजपात दाखल झालेले ज्येष्ठ नेते खा.अशोक चव्हाण हे मनपातील भाजपाच्या वरील विजयाचे मुख्य शिल्पकार ठरले.
मनपा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाने जारी केलेल्या आणि घरोघर वितरित केलेल्या जाहीरनाम्यात अनेक संकल्प सोडले. त्यांत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी तसेच जनसंघाचे संस्थापक सदस्य, भारतरत्न नानाजी देशमुख यांचे पुतळे शहरात उभारण्याचे जाहीर करण्यात आले.
मागील महिन्यात महापौर-उपमहापौरांची निवड झाल्यानंतर मनपाची पहिली सर्वसाधारण सभा येत्या सोमवारी (दि.16) होणार असून या सभेच्या विषय पत्रिकेमध्ये वाजपेयी यांच्या पुतळ्याच्या उभारणीचा विषय खा.चव्हाण यांच्या मौखिक सूचनेवरून ठेवण्यात आला आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाचे किशोर स्वामी, महेश कनकदंडे व उपमहापौर दीपकसिंह रावत हे तिघे सूचक आहेत, तर वीरेन्द्रसिंघ गाडीवाले अनुमोदक आहेत.
वाजपेयी यांचा नांदेड शहराशी फार संबंध आला नाही. काही सभांच्या निमित्ताने ते गेल्या शतकाच्या उत्तरार्धात या शहरामध्ये आले. 1971 सालची त्यांची जाहीर सभा शहराबाहेर वाजेगाव येेथे झाली, तर भाजपाच्या स्थापनेनंतरची त्यांची सभा चिखलवाडी परिसरात उदासी मठाच्या जागेत घेण्यात आली. या सभेसाठी भाजपाला स्टेडियमचे मैदान मिळू न देण्यात काँग्रेसचा ‘हात’ होता, असे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष गणपत राऊत यांनी आपल्या ‘ऊन-सावली’ आत्मकथेमध्ये नोंदवून ठेवले आहे.
आज 40 वर्षांनंतर वाजपेयींची भाजपा नांदेड शहर आणि जिल्ह्यात अव्वलस्थानी असली, तरी जिल्ह्यात या पक्षाची सारी सूत्रे काँग्रेसमधून भाजपात आलेल्या चव्हाण यांच्या हाती एकवटली आहेत. त्यांचे अनेक समर्थकही भाजपात स्थिरावले असून या सर्वांच्या पुढाकारातून भाजपाच्या पहिल्या पंतप्रधानांचा पुतळा नांदेडमध्ये नजीकच्या काळात उभारला जाणार आहे. भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांसाठी तर हा सुखद धक्का ठरला आहे. वाजपेयींचे जन्मशताब्दी वर्ष नुकतेच होऊन गेले. त्याचवेळी नांदेडमध्ये त्यांचा पुतळा उभारण्याचा संकल्प सोडला गेला.
नांदेडशी संबंधित राजकीय नेत्यांपैकी केवळ दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्याशी वाजपेयी यांचा घनिष्ठ संबंध आला. 1998मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे शंकररावांचे जामात उभे असतानाही भाजपाच्या धनाजीराव देशमुख यांच्यासाठी वाजपेयी यांनी येथील इंदिरा गांधी मैदानावरील जाहीर सभेत भाषण केले होते. तो त्यांचा शेवटचा नांदेड दौरा ठरला.
राज्यात अलीकडे झालेल्या मनपाच्या निवडणुकांमध्ये बहुतांश महापालिकांत भाजपाची सत्ता आली. या सर्व पालिकांच्या निवडणुकीत भाजपाने जाहीरनामा जारी केला. पण वाजपेयींच्या पुतळ्यांच्या उभारणीचा संकल्प केवळ नांदेड भाजपाच्या जाहीरनाम्यातच दिसला. त्याचे श्रेय अशोक चव्हाण यांच्याकडे गेले आहे.
यानिमित्ताने अधिक माहिती घेतली असता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि भाजपाचा दबदबा असलेल्या नागपूर शहरातही वाजपेयी यांचा पुतळा नाही. भाजपाच्या स्थापनेनंतरची पहिली जाहीर सभा मुंबईमध्ये घेण्यात आली. या विशाल महानगरात केवळ कांदिवली भागात वाजपेयी यांचा पुतळा उभारला गेला आहे. वर्धा येथील उद्यान ‘अटल भारत स्मारक’ म्हणून ओळखले जाते. उत्तुंग प्रतिभेच्या या नेत्याचा मराठवाड्यातील पहिला पुतळा शंकररावांच्या कर्मभूमीत त्यांच्या पुत्राच्या पुढाकारातून उभारला जात असताना या शहरातील राजकीय परिवर्तनही ठळक झाले आहे.