Umarkhed School Pro-Pakistan Song Case
उमरखेड : उमरखेड येथील अब्दुल गफूर शाह नगरपरिषद उर्दू शाळा क्रमांक ०२ मध्ये विद्यार्थ्यांकडून देशविरोधी स्वरूपाचे पाकिस्तान समर्थक गीत गायले गेल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षक, शाळा प्रशासन व जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात नवीन फौजदारी कायदा (BNS) अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली आहे.
भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक गोपाल मधुकर कन्ने यांनी या संदर्भात उमरखेड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. बुधवारी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस महेश काळेश्वरकर यांनी ही माहिती दिली.
तक्रारीनुसार, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत आयोजित कार्यक्रमांतर्गत ३१ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांकडून “ऐ मर्द-ए-मुजाहिद, तेरी तलवार कहा है” हे गीत सादर करण्यात आले. हे गीत भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात पाकिस्तानमध्ये प्रचारासाठी वापरण्यात आले होते आणि आजही तेथे लष्करी व राष्ट्रवादी कार्यक्रमांमध्ये गायले जाते, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
या गीतातून तलवार उचलण्याचे आवाहन केले जाते तसेच भारताच्या सार्वभौमत्वाविरोधात भावना भडकवल्या जातात, असा आरोप तक्रारीत नमूद आहे. अशा स्वरूपाचे गीत एका सरकारी शाळेत, तेही राष्ट्रीय सणानिमित्त आयोजित कार्यक्रमात सादर होणे ही अत्यंत गंभीर बाब असून हे कृत्य संविधानविरोधी असल्याचे म्हटले आहे.
तक्रारीनुसार, गीत सुरू असताना शाळेचे मुख्याध्यापक, उपस्थित शिक्षक तसेच संबंधित नगरसेवक व शिक्षण समितीचे पदाधिकारी यांनी कोणतीही हरकत घेतली नाही. उलट या कृतीस अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणात नवीन फौजदारी कायदा (BNS) अंतर्गत कलम १५२ (भारताची एकता, अखंडता व सार्वभौमत्व धोक्यात आणणारी कृत्ये), कलम १९६ (समुदायांमध्ये द्वेष किंवा तेढ निर्माण करणारी कृत्ये) आणि कलम १९७ (राष्ट्रीय हिताविरोधात सार्वजनिक विधाने किंवा कृती) अंतर्गत गुन्हे नोंदविण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर देशविरोधी विचारांची बीजे रोवली जात असून, यामुळे सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण होण्याची तसेच सार्वजनिक शांतता धोक्यात येण्याची शक्यता असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाची तत्काळ व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा प्रशासन व जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवावा, अशी ठाम मागणी तक्रारदारांनी केली आहे. यासोबतच गीत सादर होत असतानाचा व्हिडीओ क्लिप (पेन ड्राईव्ह) पुरावा म्हणून पोलिसांकडे सादर करण्यात आला आहे.
या गंभीर तक्रारीमुळे उमरखेड शहरात खळबळ उडाली असून, पोलीस प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.