आगामी जि.प. निवडणुकीतही मनपाचा यशस्वी फार्म्युला! pudhari photo
नांदेड

Nanded ZP PS Elections : आगामी जि.प. निवडणुकीतही मनपाचा यशस्वी फार्म्युला!

इच्छुक मनपा स्वीकृत सदस्यांसह प्रमुख भाजपा पदाधिकाऱ्यांना देणार सर्कलनिहाय जबाबदारी

पुढारी वृत्तसेवा

नांदेड ः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांना भाजपाने मनपा निवडणुकीतील दिलेली जबाबदारी यशस्वी ठरल्यामुळे नांदेड मनपातील स्वीकृत सदस्यांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सर्कलनिहाय जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नांदेड महानगरपालिका निवडणुकीत खासदार अशोक चव्हाण यांनी ग्रामीण भागातील काही पक्ष कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांवर शहरातील प्रभागनिहाय जबाबदारी सोपवली होती. विविध प्रभागांतील उमेदवारांना सहकार्य करण्यासाठी 20 सदस्यांची समिती स्थापन करून प्रचारासाठी कामाला लावले होते.

ही समिती स्थापन करताना खासदार अशोक चव्हाण यांनी या सदस्यांची विशेष बैठक घेऊन त्यांना कानमंत्रही दिला होता. भाजपच्या उमेदवारांना प्रचारासाठी वेळोवेळी सहकार्य करणे, प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना पक्षाच्या संकल्पनाम्यातील आश्वासनांची माहिती देणे, सोबतच कार्यकर्त्यांना प्रचारासाठी वाहने व इतर सुविधा उपलब्ध करून देणे आदी कामे त्यांच्यावर सोपविण्यात आली होती.

मनपा निवडणुकीत खासदार चव्हाण यांचा हा फार्म्युला अत्यंत फायदेशीर ठरला. प्रभागनिहाय दिलेली जबाबदारी प्रामाणिक व निष्ठापूर्वक पार पाडणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी देण्याबाबत प्राधान्य क्रमाने विचार होईल असाही निकष ठेवण्यात आला होता.

आता हाच फॉर्म्युला ग्रामीण पदाधिकाऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत पुन्हा एकदा अमलात आणण्याचा विचार सुरू असल्याचे समजते. त्यासाठी मनपातील स्वीकृत सदस्य पदासाठी इच्छुक असलेल्या तसेच शहरातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपविली जाणार आहे.

  • मंगळवारी महापालिकेतील पदग्रहण सोहळ्यात खासदार अशोक चव्हाण यांनी मनपातील भाजपच्या या घवघवीत यशानंतर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपला मोठे यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर येत्या दोन महिन्यांत जिल्हा परिषद निवडणूक होण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपाने मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे दिसून येते. त्यामुळे स्वीकृत सदस्य पदाच्या निवडीचा निर्णय जि.प. निवडणुकीनंतरच होऊ शकते असे एका जबाबदार पदाधिकाऱ्याने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT