Biloli Panchayat Samiti pudhari photo
नांदेड

Nanded Rural News : कार्यालयात रिकाम्या खुर्च्या; बाहेर नागरिकांची प्रतीक्षा!

बिलोली पंचायत समितीच्या कारभाराबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र कांबळे

बिलोलीः तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी असलेल्या बिलोली पंचायत समितीच्या कारभाराबाबत नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून कार्यालयीन वेळेत विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिकाम्या खुर्च्या दिसत असल्याने ग्रामीण भागातून कामासाठी येणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून कार्यालयाबाहेर अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करावी लागत असल्‍याचे नागरिकांतून सांगितले जात आहे.

पंचायत समिती ही ग्रामीण जनतेच्या विविध शासकीय कामांसाठी महत्त्वाची यंत्रणा आहे. मात्र, याच कार्यालयात वेळेवर अधिकारी व कर्मचारी उपलब्ध नसल्याच्या तक्रारी समोर येत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महिला, शेतकरी आणि इतर नागरिक आपली कामे घेऊन कार्यालयात येतात; परंतु संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी उपलब्ध नसल्यास त्यांना ताटकळत बसण्याची वेळ येते. वारंवार हेलपाटे मारूनही कामे होत नसतील, तर सामान्य जनतेने दाद मागायची तरी कुणाकडे, असा सवाल उपस्थित होत आहे.

या संपूर्ण प्रकाराची नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची अचानक तपासणी करावी, कार्यालयीन वेळेचे पालन होते की नाही याची पडताळणी करावी आणि तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

रामतीर्थ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संदर्भात झालेल्या कारवाईच्या धर्तीवर बिलोली पंचायत समितीतील कारभाराचीही सखोल चौकशी करावी, अशी मागणी पुढे येत आहे. ग्रामीण जनतेच्या कामांना प्राधान्य मिळणार की नागरिकांना हेलपाटे मारतच राहावे लागणार? आता तरी जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पंचायत समितीतील बहुतांश कर्मचारी नांदेडहून ये-जा करीत असल्याने काही कर्मचारी उशिरा येतात आणि लवकर निघून जातात, अशी नागरिकांची तक्रार आहे. या प्रकारामुळे कार्यालयीन वेळेचे पालन होते की नाही, याची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. शासकीय कार्यालयात जनतेची कामे वेळेत होणे अपेक्षित असताना नागरिकांना प्रतीक्षेत ठेवण्याची वेळ येत असेल, तर त्याची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT