नांदेड

Nanded news: दिव्यांग तरुणीचे मानधन ४ वर्षांपासून बंद; 'त्या' दृश्याने तहसील कार्यालय सुन्न

या हलाखीच्या परिस्थितीत तिच्यावर उपासमारीची वेळ आली आहे

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र कांबळे

बिलोली : प्रशासकीय अनास्था आणि नियमांच्या जाचक अटींचा फटका एका गरजू दिव्यांग मुलीला कसा बसतो, याचा अत्यंत वेदनादायी प्रकार बिलोली तहसील कार्यालयात समोर आला आहे. बिलोली तालुक्यातील बिजूर येथील रहिवासी असलेल्या सुनिता ज्ञानोबा वाघमारे या अत्यंत गरीब दिव्यांग तरुणीचे संजय गांधी निराधार योजनेतून मिळणारे मासिक मानधन मागील तब्बल चार वर्षांपासून बंद करण्यात आले आहे. यामुळे या हलाखीच्या परिस्थितीत तिच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

सुनिता वाघमारे हिला दोन्ही पायांनी चालता येत नाही. तिच्या घरात कमावणारे कोणीही नाही. वडील पाठीशी नाहीत आणि आई मजुरी करून कशीबशी उदरनिर्वाह करते. सद्यस्थितीत सुनिताचे पालनपोषण तिची वृद्ध आजी करत आहे. ४ वर्षे मानधन बंद असल्याने ही कुटुंबियांची बिकट अवस्था पाहून गावातील काही जागरूक नागरिकांनी पुढाकार घेतला. त्यांनी सुनिताला स्वतःच्या वाहनात बसवून बिलोली तहसील कार्यालय गाठले. तहसील कार्यालयात पोहोचल्यावर सुनिताला चालता येत नसल्याने, उपस्थित जागरूक नागरिकांनी तिला हातावर उचलून संजय गांधी निराधार विभागात नेले. हे दृश्य पाहून तहसील परिसरातील नागरिक सुन्न झाले. व प्रशासनाच्या ढिसाळ व्यवस्थापनावर रोष व्यक्त केला.

संजय गांधी निराधार विभागात चौकशी केली असता, मागील चार वर्षांपासून सुनिताचे वेतन थकल्याची गंभीर बाब समोर आली. मात्र, येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहानुभूती दाखवण्याऐवजी तिला पुन्हा उत्पन्नाचे दाखले व इतर कागदपत्रे सादर करण्याची सूचना केली. आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की, स्वतः चालता न येणारी दिव्यांग सुनिता आणि तिची वृद्ध आजी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवून ही कागदपत्रे कशी आणि कोण काढणार? प्रशासनाच्या या तांत्रिक भूमिकेमुळे या दोन्ही असहाय्य महिलांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन बिलोलीचे तहसीलदार गजानन शिंदे, उपविभागीय अधिकारी (SDO) क्रांती डोंबे आणि जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तात्काळ संवेदनशीलतेने लक्ष घालण्याची गरज आहे.आता या संवेदनशील प्रकरणात जिल्हा प्रशासन आणि बिलोलीचे तहसीलदार सुनिताला न्याय देण्यासाठी गतिमान पावले उचलतात का, की कागदपत्रांच्या चक्रव्यूहात या दिव्यांगाची उपासमार अशीच सुरू राहते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

आम्ही गरीब आहोत, मला चालता येत नाही आणि आजी वृद्ध आहे. प्रशासनाने आमच्या घरी कर्मचाऱ्यांना पाठवून कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी आणि माझे हक्काचे मानधन तात्काळ सुरू करावे," अशी आर्त हाक दिव्यांग सुनिता वाघमारे हिने प्रशासनाला दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT