नांदेड ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचत, सोने खरेदी टाळणे आणि काटकसरीचा अवलंब करण्याचे आवाहन केल्यानंतर आता काँग्रेसकडून भाजप नेत्यांनाच आरसा दाखवण्यात आला आहे.
भोकर विधानसभा मतदारसंघातील युवा काँग्रेस कार्यकर्ते संदीपकुमार देशमुख बारडकर यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून भाजपाच्या आजी-माजी पदाधिकारी, मंत्री, आमदार आणि खासदारांनी स्वतः सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून जनतेसमोर आदर्श निर्माण करावा, अशी मागणी केली आहे.
10 मे 2026 रोजी हैद्राबाद येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी पश्चिम आशियातील तणावामुळे वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किंमतींचा परिणाम भारताच्या परकीय चलन साठ्यावर होत असल्याचे सांगत इंधन बचतीचे आवाहन केले होते. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते संदीपकुमार देशमुख यांनी थेट भाजप नेत्यांनाच लक्ष्य करत “परिवर्तनाची सुरुवात सत्ताधाऱ्यांनी स्वतःपासून करावी,” असे म्हटले आहे.
पत्रात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, “देशातील सामान्य नागरिकांना इंधन बचतीचा सल्ला दिला जात असेल, तर सर्वप्रथम भाजपाचे मंत्री, आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना रेल्वे, मेट्रो, शासकीय बस आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अनिवार्य करण्यात यावा.” तसेच देशातील बेरोजगारी, महागाई आणि आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकप्रतिनिधींची आलिशान जीवनशैली जनतेच्या रोषाला कारणीभूत ठरत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
“देशप्रेम हे भाषणातून नव्हे तर कृतीतून दिसले पाहिजे. भाजपाचे नेते जर बस आणि रेल्वेतून प्रवास करताना दिसले, तरच जनतेला काटकसरीचा खरा संदेश जाईल,” असा टोला त्यांनी लगावला.
याशिवाय केंद्र सरकारने अनावश्यक विदेशी दौरे, खर्चिक सरकारी कार्यक्रम आणि विमान प्रवासावर नियंत्रण आणावे, अशी मागणीही पत्रातून करण्यात आली आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी पुढील एक वर्ष सोने खरेदी न करण्याची शपथ घ्यावी, अशी मागणी करत देशात साधेपणाचा आदर्श निर्माण करण्याचे आवाहन संदीपकुमार देशमुख बारडकर यांनी केले आहे.