विठ्ठल फुलारी
भोकर : जर्सी गायीच्या पोटी जन्माला आलेली कालवड तीन वर्षांत पुन्हा गाय होऊन दूध देण्यास सुरुवात करते. परंतु, अनेकदा गायीच्या पोटी गोरं जन्म घेते आणि दुग्ध व्यवसायाचे अर्थकारण बिघडते. त्यामुळे ‘सेक्स सॉर्टेड सीमेन’ या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या गोठ्यात कमी वेळात जास्तीत जास्त कालवड जन्माला आणने गरजेचे असल्याने भोकर तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात एचएफ होलीस्टीन फ्रीजीयन गायीसाठी सॉर्टेड सीमेन उपलब्ध झाले आहे. त्यामुळे आता दुग्ध व्यवसायला बळ मिळणार आहे.
मागील तीन दशकांपूर्वी भोकर तालुक्यात दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात होता. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देत होते. यावेळी भोकर येथील शासकीय दूध संकलन केंद्रात जवळपास 28 हजार लिटर दूध संकलन होत होते. परंतु, सध्या दुध व्यवसायाची परिस्थिती खूप वाईट झाली आहे.
दुग्ध व्यवसाय कमी होण्यासाठी जसा दुधाचा भाव कारणीभूत आहे. तसाच म्हैस किंवा गायीच्या पोटी जन्माला येणाऱ्या वासरूही कारणीभूत आहे. जर म्हशीच्या पोटी वगार आणि गायीच्या पोटी कालवड जन्माला आली तर ती तीन वर्षांत दूध देणारी गाय व म्हैस तयार होते. आणि दुग्ध व्यवसायाला चालना मिळते.
परंतु, बऱ्याचदा गायीच्या पोटी गोरं, म्हशीच्या पोटी रेडा जन्म घेते आणि दुग्ध व्यवसाय अर्थकारण बिघडते. त्यामुळे म्हशीच्या पोटी वगार आणि जर्सी गायीच्या पोटी कालवड जन्माला येणे आवश्यक आहे.
‘सेक्स सॉर्टेड सीमेन’ या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या गोठ्यात कमी वेळात जास्तीत जास्त वगारी व कालवड जन्माला आणता येवू शकते. परंतु, ही सुविधा जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडे उपलब्ध नव्हती. खाजगीमध्ये यासाठी जास्त रक्कम मोजावी लागत असल्याने याचा उपयोग शेतकरी किंवा पशुपालक करत नाहीत. पण सध्या जर्सी होलीस्टीन फ्रीजीयन गायीसाठी सेक्स सार्टेड सीमेनची उपलब्धता झाली आहे.
त्यामुळे कालवडीचा जन्मदर वाढणार असून दुग्ध व्यवसायालाही गती मिळण्यास मदत होणार आहे. तालुक्यातील होलीस्टीन फ्रीजीयन गायीचे सॉर्टेड सीमेन वीस डोस उपलब्ध झाले असल्याचे सांगण्यात आले.
सार्टेड सीमेन म्हणजे काय ?
गाय व म्हशीला कृत्रिम रेतन केले जाते.
यामध्ये गुणसूत्र एक्स वाय असल्याने वासराचे लिंग लक्षात येत नाही. आणि पन्नास पन्नास टक्के नर मादी जन्माला येतात. पण सार्टेड सीमेन हे प्रक्रियायुक्त असते.
यात केवळ एक्स गुणसूत्र असल्याने जन्माला येणाऱ्या मध्ये 90 टक्के कालवड व वगारीचा जन्म होतो.
यामुळे दुग्ध व्यवसाय वाढविण्यासाठी सेक्स सार्टेड सीमनची आवश्यकता आहे.
सेक्स सॉर्टेड सीमेन म्हणजे गाईमध्ये लिंग आधारित वीर्य वापरून 90 ते 95 टक्के मादी वासरे जन्माला येण्याची शक्यता असते हे तंत्रज्ञान वापरल्याने दुग्ध व्यवसायात मादी वासरे मिळण्याची शक्यता 90 ते 95 टक्के असते ज्यामुळे नफा वाढतो मादी वासरे जास्त मिळाल्यास दुधाचे उत्पादन वाढते हे सिमेंन प्रामुख्याने चांगल्या तब्येतीच्या निरोगी आणि उच्च प्रजननक्षम असलेल्या गाईमध्ये वापरावे व तज्ञ पशुवैद्यकाकडून रेतन करून घ्यावे.डॉ अविनाश बुन्नावार, (पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती, भोकर)